coronavirus: सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सुचवला असा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 06:58 AM2021-04-03T06:58:04+5:302021-04-03T06:58:30+5:30

coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे.

coronavirus: Lockdown is not affordable, a solution suggested by Congress leader Bhai Jagtap to CM | coronavirus: सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सुचवला असा उपाय

coronavirus: सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सुचवला असा उपाय

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनचे संकेत दिले होते. मात्र आता राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने लॉकडाऊनबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. ( Lockdown is not affordable, a solution suggested by Congress leader Bhai Jagtap  to CM)

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर त्यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यााबाबत काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा सरसकट लॉकडाऊन परवडणारा नसल्याचे विधान केले. भाई जगताप म्हणाले की, मला असं वाटतं की कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्याची चिंता तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. स्वाभाविकपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनाही ती चिंता आहे. परंतु लॉकडाऊनबाबत याआधीही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पूर्ण लॉकडाऊन न करता आता जो काही नाईट कर्फ्यू आहे त्यामध्ये परिस्थितीचं गांभीर लक्षात घेऊन अधिक काय करता येईल याचा विचार व्हायला हवा, असे भाई जगताप यांनी सांगितले.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांचाही भाई जगताप यांनी यावेळी उल्लेख केला. आज सर्वसामान्यांची परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊनचा सामना करण्याची त्यांची क्षमता नाही. मागचं वर्षं मागचं लॉकडाऊन कसंतरी या सर्वसामान्यांनी काढलं आहे. आता त्यांच्याकडे काही उरलेलं नाही. त्यामुळे आता एक नवीन आव्हान राज्यासमोर आणि सरकारसमोर असेल. त्यामुळे पूर्णत: लॉकडाऊन नसावा, या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत, असे काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.   

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलो आहे. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा एकप्रकारे इशारा दिला आहे.

Web Title: coronavirus: Lockdown is not affordable, a solution suggested by Congress leader Bhai Jagtap to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.