congress leader balasaheb thorat hits back at bjp leader devendra fadnavis | ...तर आम्ही तुमचं कौतुकच करू; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या फडणवीसांना थोरातांचं प्रत्युत्तर

...तर आम्ही तुमचं कौतुकच करू; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या फडणवीसांना थोरातांचं प्रत्युत्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाला 'थिल्लरपणा' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सुसंस्कृत नेते मानतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधानं अपेक्षित नाहीत. सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल गेला आहे. त्यामुळे ते असे शब्द वापरू लागले आहेत, अशा शब्दांत थोरातांनी फडणवीसांवर टीका केली.

केंद्रानं राज्याच्या हक्काचे पैसे वेळेवर दिले असते, तर आज राज्य सरकारवर त्यांच्याकडे मदत मागण्याची वेळ आली नसती, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी भागांचा दौरा करताना म्हटलं. त्यावर या परिस्थितीत राज्य सरकार लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी घणाघाती टीका केली.

गंभीर दौऱ्यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शोभत नाही: देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं. 'केंद्रानं राज्य सरकारच्या हक्काचा जीएसटी अद्याप दिलेला नाही. केंद्राकडे ३० हजार कोटी रुपये थकलेले आहेत. महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक जीएसटी जातो. पण दुर्दैवानं राज्याला हक्काचे पैसे मिळत नाहीत. राज्याच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी फडणवीस आणि भाजपनं राज्य सरकारला मदत करावी. आम्ही त्यांचं कौतुकच करू,' असं थोरात म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; "जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..."

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिंमत नाही. मुख्यमंत्री दोन-तीन तासांचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.

लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर बाण

केंद्र सरकारनं आमचे पैसे अडकले आहेत ते अगोदर द्यावेत असं मुख्यमंत्री म्हणतात, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की राज्याकडून जीएसटी कमी आला आहे. त्याची भर काढण्यासाठी केंद्रानं कर्ज काढून राज्याला पैसे दिले आहेत. मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्या हिंमत नाही का? आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख २० हजार कोटी कर्ज काढण्याची मुभा आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

Web Title: congress leader balasaheb thorat hits back at bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.