गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:03 AM2019-01-23T06:03:01+5:302019-01-23T06:03:45+5:30

उत्तर आणि दक्षिण गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असले तरी, दोन्ही मतदारसंघांत यंदा या पक्षाची कसोटी लागणार आहे.

BJP's Test in Goa; Will the friendly side accompany this year? | गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

Next

- सदगुरू पाटील
उत्तर आणि दक्षिण गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असले तरी, दोन्ही मतदारसंघांत यंदा या पक्षाची कसोटी लागणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपाला खूपच संघर्ष करावा लागेल हे पक्षाचे काही पदाधिकारीही मान्य करतात. भाजपाने उत्तर गोवा मतदारसंघात निरीक्षक म्हणून माजी आमदार दामू नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून, दक्षिण गोव्याची जबाबदारी आहे सदानंद शेट तानावडे यांच्याकडे. पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात अकरा लाख मतदार आहेत. प्रत्येकी साडेपाच लाख मतदार दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये आहेत. उत्तर गोवा हा १९९९ सालापासून भाजपचा बालेकिल्ला आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून सातत्याने निवडून येत आहेत. यंदा ते पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जातील. नाईक ओबीसी आहेत. उत्तर गोव्यात ओबीसीची मतदारसंख्या सुमारे अडीच लाख असल्याने नाईक यांना ती एकगठ्ठा मते मिळत आली. मात्र वारंवार श्रीपाद नाईक यांनाच आपण निवडून का म्हणून द्यावे अशी चर्चा आता मतदारांत आहे. नाईक यांनी उत्तर गोव्यात अनेक प्रकल्प मार्गी लावले. पण खाण व्यवसाय बंद असल्याने नाईक यांना विजयासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होईल.
दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर एकदाच लोकसभा निवडणूक
जिंकले. त्यांना यंदा पराभूत करण्याचा चंग काँग्रेसच्या आमदारांनी बांधला आहे. २०१४ साली मोदी लाट होती व दक्षिण गोव्यात भाजपाकडे आमदारांची संख्याही बऱ्यापैकी
होती. त्याचा लाभ सावईकर यांना झाला. सावईकर यांचा संपर्क मतदारांशी आहे, पण भाजपाकडे आता आमदार कमी असून, गोवा फॉरवर्ड व मगोप कितपत साथ देतील ते स्पष्ट नाही.
गोव्याचा खाण व्यवसाय सुरू न झाल्यास भाजपावर परिणाम होईल, असे गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनीसांगूनच टाकले आहे. खाण व्यवसाय लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल असे भाजपाच्या खासदारांना वाटते.
>उत्तर व दक्षिण दोन्ही मतदारसंघात काय स्थिती?
दक्षिण गोव्यात काँग्रेसने हिंदू उमेदवार उभा केला तर कडवी झुंज होईल, असे मानले जाते. यापूर्वी फ्रान्सिस सार्दिन, चर्चिल आलेमाव हे दक्षिण गोव्यातून निवडून आले. दक्षिण गोवा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला होता, पण त्याला भाजपाने २०१४ साली खिंडार पाडले. भाजपाची संघटना सुधारत असली तरी, काँग्रेसने प्रबळ उमेदवार उभा केल्यास भाजपाचा मार्ग अधिक खडतर होईल.उत्तर गोव्याचे खासदार नाईक यांचा स्वभाव मनमिळावू व नम्र आहे. मात्र त्यांच्यासाठीही यावेळची निवडणूक सोपी दिसत नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दर निवडणुकीवेळी सक्रिय असायचे व त्यामुळे भाजपाला विजय मिळण्यास मदत व्हायची. आता पर्रीकर आजारपणामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे भाजपाच्या आव्हानांमध्ये भरच पडली आहे.

Web Title: BJP's Test in Goa; Will the friendly side accompany this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.