"मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी"

By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 08:11 AM2020-10-26T08:11:07+5:302020-10-26T08:15:36+5:30

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपकडून पलटवार

bjp mla ram kadam slams cm uddhav thackeray dasara melava speech | "मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी"

"मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी"

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना विरोधकांचा समाचार घेतला. मी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून बोलतोय, असं म्हणत ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर आता भाजप नेत्यांनी उद्घव ठाकरेंच्या भाषणावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव यांनी सावरकर सभागृहातून भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं.

भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात,' असं कदम म्हणाले.



भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा मास्क बाजुला ठेवून केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपावर टीका केली. याऐवजी किमान शिवसैनिकांसमोर बोलताना त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती, असं उपाध्ये म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करण्यात गेला. शिवसैनिकांना सुद्धा त्यांच्या सरकारने काय केले हे सांगण्यासारखे ठोस काही नसावे. पुढच्या महिन्यात काम काय केले ते सांगणार असे सांगून भाषणाचा वेळ घालवला. आजच्या भाषणात काहीच नव्हते. औरंगजेब, वाघ, कोथळा, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते, अशी टीका उपाध्ये यांनी केली.



अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 



महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय, शेतकऱ्यांची व्यथा भाषणात सांगितली. पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे. जीएसटी संदर्भात केंद्राने दिलेला प्रस्ताव देशातील २० पेक्षा अधिक राज्यांनी स्वीकारला व ते पुढे गेले. मात्र, राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यात कोणताही रस नाही. कोरोना हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली. 

राज्यातील कोणत्याही घटकास सरकारने दिलासा दिला नाही. अशा वेळी किमान आज शिवसैनिकांसमोर बोलताना तरी काही ठोस सांगतील, असे वाटत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री कुठे बाहेर पडले नाहीत. देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. पीपीई किट घोटाळा झाला. महिलांवर अत्याचार वाढले त्याबद्दल उध्दव ठाकरे काही बोलले नाहीत, असे उपाध्ये म्हणाले. 

Web Title: bjp mla ram kadam slams cm uddhav thackeray dasara melava speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.