Allegation of Nilesh Rane on CM Uddhav Thackeray & Shiv Sena over Nanar Refinery Project land | नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावानेच केले १४०० एकर जमिनीचे व्यवहार; निलेश राणेंचा आरोप

नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावानेच केले १४०० एकर जमिनीचे व्यवहार; निलेश राणेंचा आरोप

ठळक मुद्देयुतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केलेसगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत.

मुंबई – नाणार प्रकल्पावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या जमिनीच्या व्यवहारात ८० टक्के परप्रांतीयांना जमिनी दिल्या असल्याचाही दावाही निलेश राणेंनी केला.

याबाबत निलेश राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी म्हटलं की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहे. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच युतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केले, तेव्हा त्यांच्या मावशीचा मुलगा जमिनीचे व्यवहार करत होता. दीपक वायंगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी राहण्यासाठी आणि ऑफिससाठी जमीन घेतली, लॉकडाऊनकाळात ऑफीस बंद पडल्याने स्टाफ निघून गेला. सध्या त्या ऑफिसला कोणीही नाही. कावतकर यांनी जमिनीचे अँग्रीमेंट बनवले. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला लावली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ प्रकल्पबाधित जमिनीचे व्यवहार करत होते असा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.

त्याचसोबत मावशीचा मुलगा असल्याने त्यांच्याशी संबंध नाहीत असं मुख्यमंत्री सांगू शकत नाहीत, कारण यांच्या साखरपुड्यात, लग्न समारंभात उद्धव ठाकरेंचे फोटो आहेत. सुगी कंपनीने मध्यस्थी राहून जमिनीचे व्यवहार केले, त्यात ८० टक्के जमिनीचे व्यवहार परप्रांतीयांशी केले. ऋतुजा डेव्ल्हपर्स कंपनी जी पुण्याची आहे, तिनेही नाणारमध्ये ९०० एकर व्यवहार केला आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख कमलाकर कदम यांनी उफळे परिसरात ३६ एकर जमिनीवर स्वत:चं कुळ म्हणून लावलं आहे. त्याबाबत कोर्टात खटला सुरु आहे. प्रकल्पाला विरोध असताना यांचे विभागप्रमुख, शहराध्यक्ष जमिनीचे व्यवहार करत आहेत असंही निलेश राणे म्हणाले.

राजापूर एमआयडीसीमध्येही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कोवड, बारसू, सोलगाव येथे एमआयडीसी येणार असं नक्की झालं.  शिवसेनेचे पदाधिकारी संकेत खळपे, गजानन कोलवणकर, करण भुतकर यांनी शेतकऱ्यांकडून जमिनीची पॉवर ऑफ अर्टिनी घेतली, ज्या सातबारावर शासनाने बंदी आणली आहे. याच्या व्यवहाराला परवानी नसताना एमआयडीसीमधील बंद सातबाऱ्याची खरेदी झाली आहे. नाणार आणि राजापूर एमआयडीसी जी याच सरकारने जाहीर केली, त्यात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे हात जमिनीच्या लूटमारीत बरबटलेले आहेत असा आरोप निलेश राणेंनी केला.

Web Title: Allegation of Nilesh Rane on CM Uddhav Thackeray & Shiv Sena over Nanar Refinery Project land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.