झेब्रा क्रॉसिंग फक्त शोभेलाच!
By Admin | Updated: March 24, 2017 04:08 IST2017-03-24T04:08:15+5:302017-03-24T04:08:15+5:30
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. दररोज नवी वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ

झेब्रा क्रॉसिंग फक्त शोभेलाच!
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. दररोज नवी वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा व त्यांच्या सोयी-सुविधांचा फारसा विचार होताना दिसत नाहीये.
बहुतांश सिग्नलला वाहने झेब्रा क्रॉसिंगलाच उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातही गजबजीच्या रस्त्यांवर तर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’च होते. पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी लागणाऱ्या विशिष्ट सिग्नलची संख्या पुण्यात बोटावर मोजण्या इतकीच आहे. जास्त पादचारी संख्या असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारचे सिग्नल उभारण्यात येतात.
निगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील सिग्नलला अनेकदा पोलीस कर्मचारी उभा असेल तरच वाहनचालक सिग्नलला थांबतात. त्यातही झेब्रा कॉसिंगच्या नियमाचे पालन करणाऱ्यांची संख्या कमीच असते. अशीच परिस्थीती इतर ठिकाणांची आहे. वाहनचालकांनी जरी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळणे अपेक्षित असले, तरी रस्ते व झेब्रा क्रॉसिंगची रचना निर्दोष असणे तितकेच गरजेचे आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी या रचनेवर लक्ष देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात येत नाही.
रस्त्याच्या लांबीनुसार वेळ ठरवणे अपेक्षित असताना तसा वेळ दिला जात नाही. दहा मीटरचा रस्ता असल्यास किमान पंधरा सेकंद वेळ देणे अपेक्षित आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सर्वप्रथम रस्त्याच्या रचनेतील दोष दूर करणे गरजेचे आहे. अनेकदा झेब्रा क्रॉसिंगचा पट्टा तिरपा मारला जातो, असे काही नागरिकांनी सांगितले.
तर काही ठिकाणी जेथे हा पट्टा संपतो तेथे दुभाजक आलेला असतो. स्टॉपलाइन, सिग्नलचे खांब हेही निर्दोष असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवे. लोकांची मानसिकता बदलणे हा यातील सर्वांत मोठा भाग असला, तरी पादचाऱ्यांसाठी योग्य रचनेचा रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. (प्रतिनिधी)