पिंपरी : पैशाच्या वादातून लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणाचा खून केला. खून, धमकी, शस्त्र बाळगणे व पोलिस अधिनियमाचे उल्लंघन अशा विविध कलमांतर्गत या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोशी येथे मोशी-देहू रस्त्यावर शुक्रवारी (दि. १६ मे) रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव बर्गे (वय ३९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या ३५ वर्षीय पत्नीने शुक्रवारी (दि. १६) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अशोक पंडित म्हाळसकर (३२), रोहन पंडित म्हाळसकर (२२), प्रसाद पंडित म्हाळसकर (२५), संकेत हिरामण जैद (२७), अमर अंकुश निळे (२५, सर्व रा. चिंबळी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती ज्ञानेश्वर बर्गे यांचा संशयितांसोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. यावेळी संशयितांनी लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने बर्गे यांना जबर मारहाण करत ठार मारले. भांडण सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला देखील धमकी दिली.