पिंपरीतील गदिमा नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 18:30 IST2020-10-01T18:29:30+5:302020-10-01T18:30:15+5:30
ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने नाट्यग्रह उभारले जात आहे. ही शहरासाठी अभिमान आणि गौरवाची बाब आहे..

पिंपरीतील गदिमा नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार
पिंपरी: मराठी सारस्वतातील अत्यंत मान्यवर साहित्यिक आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असलेल्या ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने पिंपरी - चिंचवड महापालिकेच्यावतीने नाट्यग्रह उभारले जात आहे. ही शहरासाठी अभिमान आणि गौरवाची बाब आहे. आराखड्यात बदल झाल्याने तसेच हे नाट्यगृह आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे काहीसा विलंब झालेला आहे. या प्रश्नाबाबत प्राधिकरण भागातील नगर सदस्यांनी सदस्यांनी बैठक आयोजित करावी, अशी सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच बैठक घेऊन नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र, हे काम गेल्या सहा वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनीही हा प्रकल्प अधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. गदिमांची आज ( दि.१ ऑक्टो. ) १०१ वी जयंती आहे. त्या निमित्ताने 'सहा वर्षे रखडले गदिमा यांचे नाट्यगृह' असे वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केले होते. रखडलेल्या या प्रकल्पाविषयी कला आणि साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या वृत्ताची दखल महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर नाट्यगृहाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तातडीने या आठवड्यात बैठक घेणार आहे, असे ढाके यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले.