जनजागृतीसाठी खर्च कशाला? सामाजिक संघटनांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:23 IST2018-01-02T02:23:18+5:302018-01-02T02:23:41+5:30
पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती होण्यासाठी सर्व उपक्रमांसाठी १७ लाख ७३ हजार रुपये या खर्चास स्थायी समितीच्या मागील सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली. जवळपास १८ लाख रुपये केवळ जनजागृतीवर खर्च करण्यापेक्षा यामधील अधिकाधिक रक्कम प्रत्यक्षात स्वच्छता अभियानावर खर्च केली गेली, तर शहर अधिक स्वच्छ होईल, असा सूर...

जनजागृतीसाठी खर्च कशाला? सामाजिक संघटनांचा सवाल
रावेत : पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती होण्यासाठी सर्व उपक्रमांसाठी १७ लाख ७३ हजार रुपये या खर्चास स्थायी समितीच्या मागील सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली. जवळपास १८ लाख रुपये केवळ जनजागृतीवर खर्च करण्यापेक्षा यामधील अधिकाधिक रक्कम प्रत्यक्षात स्वच्छता अभियानावर खर्च केली गेली, तर शहर अधिक स्वच्छ होईल, असा सूर अनेक सामाजिक संघटना, विविध मित्र मंडळे, शहर स्वच्छतेसाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन वेळप्रसंगी स्वत:चा पैसा खर्च करून स्वच्छता अभियान राबविणाºया संघटनांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारचे शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि मिशन निदेशक यांनी स्वच्छ शहर अभियान राबविण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिके मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत शहरात विविध वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत संदेश देणारे फ्लेक्स, बॅनर लावण्यात आले आहेत.
मेळावे, पथनाट्ये घेण्यात येत आहेत. तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती स्वच्छता रॅली काढली जात आहे. विद्यार्थी व नागरिकांना केंद्र शासनाचे स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या कर्मचाºयांनाही प्रशिक्षण दिले गेले आहे. केवळ कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन स्वच्छता अभियान सफल होईल का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत
आहेत.
शहराच्या विद्रूपीकरणाच्या विरोधात वाल्हेकरवाडी येथील गुरुदत्त मित्र मंडळ, सचिन चिंचवडे मित्र मंडळ आणि एसएफजेव्ही ग्रुप यांच्या वतीने चापेकर चौकात चिकटवलेल्या जाहिराती काढण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. चापेकर चौक या उपक्रमामुळे स्वच्छ झालेला पहावयास मिळत आहे. विविध ठिकाणी विद्रूपीकरणास आणि अस्वच्छतेस कारणीभूत ठरत असलेल्या बाबींवर पालिकेने लाखांतील काही रक्कम खर्च करावी.
केंद्र शासनाच्या पथकाच्या वतीने शहरात स्वच्छ शहर ४ ते ६ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. स्वच्छतेसंदर्भात चित्रफीत तयार केली जाणार आहे. विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी रिक्षा, माईक, साउंड सिस्टीम, बक्षिसे, कलावंत मानधन असा खर्च होणार आहे. केंद्रीय पथकाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पुढील महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
होर्डिंग्जचा वापर : शहराचे वाढते विद्रूपीकरण
काही कामगारांना दररोज ३०० रुपयांप्रमाणे शहर स्वच्छतेसाठी रोजगार उपलब्ध करून दिला, तर जवळपास सहा हजार नागरिकांना यामधून रोजगार निर्माण होईल आणि शहरसुद्धा स्वच्छ होईल. महापालिकेनेही स्वच्छ शहर स्पर्धेत आपला क्रमांक सुधारावा म्हणून कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांसह महापालिका अधिकारी व कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाचे ‘स्वच्छता’ हे मोबाइल अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिक व विद्यार्थी सदर अॅप डाउनलोड करून महापालिकेस प्रतिसाद देत आहेत. शहरात स्वच्छता अभियान रॅली काढून आणि र्होडिंग्ज लावून जनजागृती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहर विद्रूपीकरणाचे काम सुरू आहे.