विद्यार्थ्यांनी खेळायचे कोठे?
By Admin | Updated: February 1, 2016 00:36 IST2016-02-01T00:36:45+5:302016-02-01T00:36:45+5:30
मुलांना मोफत गणवेश, गुणवंतांना लाखाचे बक्षीस आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोट्यवधींची खर्च करणाऱ्या महापालिका शाळा अद्यापही उद्यानांपासून वंचित आहेत

विद्यार्थ्यांनी खेळायचे कोठे?
पिंपरी : मुलांना मोफत गणवेश, गुणवंतांना लाखाचे बक्षीस आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोट्यवधींची खर्च करणाऱ्या महापालिका शाळा अद्यापही उद्यानांपासून वंचित आहेत. महापालिकेच्या १४९ पैकी जवळपास २८ शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळायचे कोठे असा प्रश्न उपस्थित होतो. पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या अंतर्गत प्राथमिक विभागाच्या १४९ शाळा आहेत. मात्र, बहुतांश शाळांना मैदाने नाहीत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांना मैदाने असणे आवश्यक आहेत. खेळांच्या माध्यमांतून चांगले खेळाडू घडावेत, यासाठी महापालिकेने कला-क्रीडा विकास प्रकल्प सुरू आहे. मात्र, हा विभाग केवळ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यापलीकडे काहीही करीत नसल्याचे दिसून येते. तसेच महापालिका शिक्षण विभागाकडूनही मैदानांसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे खेळांचा आवडता तास हा मैदानांविना नावडता होऊ लागला आहे.
किमान पाच गुंठ्यांचे मैदान असावे
शहरात शाळांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले असता, पिंपरीतील २७ पैकी दोन शाळांना, चिंचवडमधील दोन शाळांना, सांगवीतील सात, भोसरीतील १५ शाळांना मैदाने नाहीत. कबड्डी, खो-खो, लंगडी असे मैदानी खेळ खेळण्यासाठी साधारण विद्यार्थिसंख्येनुसार शाळेला कमीत कमी पाच गुंठे जागा असणे गरजेचे आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियमाप्रमाणे शाळेत दहा मूलभूत सुविधेमध्ये मैदानांचा समावेश आहे. मात्र, ज्या शाळांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने नाहीत, त्या शाळांना एक किलोमीटरच्या आतील शाळांची मैदाने दिली जातात. मात्र, ही मैदाने भाडेतत्त्वावर घ्यावी लागतात. त्यामुळे भाडेतत्त्वावर मैदाने घेण्यासाठी कोणी सरसावत नाही.
मैदानांची परिस्थिती सुधारली आहे. बोपखेल, कासारवाडी, वैदूवस्ती आदी शाळांच्या मैदानांचे सपाटीकरण केले आहे. पंरतु ज्या शाळांना जागेची अडचण आहे, ती आरक्षणे ताब्यात घेतलेली नाहीत. मात्र, ही शाळांची परिस्थिती सुधारायला हवी. - चेतन घुले, सभापती, शिक्षण मंडळ