चर्चेचे गुऱ्हाळ संपणार कधी?
By Admin | Updated: September 30, 2015 01:05 IST2015-09-30T01:05:26+5:302015-09-30T01:05:26+5:30
गेल्या काही महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’ सारखे एफटीआयआयच्या प्रश्नावर केवळ ‘चर्चे पे चर्चा’चं घडत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय

चर्चेचे गुऱ्हाळ संपणार कधी?
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’ सारखे एफटीआयआयच्या प्रश्नावर केवळ ‘चर्चे पे चर्चा’चं घडत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने एफटीआय-आयच्या विद्यार्थी शिष्टमंडळाशी मंगळवारी मुंबईत जी चर्चा केली ती सकारात्मक झाली असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या बैठकीतही एफटीआयआयच्या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नसल्याने येत्या १ आॅक्टोबरला मंत्रालयाची समिती आणि विद्यार्थी यांच्यात पून्हा चर्चेचे गुऱ्हाळ रंगणार असून, या प्रश्नावर अंतिम मार्ग निघण्याची शक्यता आहे.
गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करावी आणि एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेकरिता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११०वा दिवस होता. मंत्रालयाच्या वतीने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतरच पहिल्यांदा मुंबई येथे मंत्रालय व विद्यार्थी यांच्यात काहीशी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या बैठकीमधून अंतिम तोडगा निघेल असे वाटले होते. मात्र झाली केवळ चर्चाच! विद्यार्थी शिष्टमंडळाने संजय गुप्ता (सहसचिव-चित्रपट), दिपक शर्मा (उपसचिव) व मुकेश शर्मा (फिल्म डिव्हिजन संचालक, मुंबई) या त्रिसदस्यीय समितीसमोर मागण्या मांडल्या. (प्रतिनिधी)