वाहतूककोंडीतून सुटका होणार कधी?

By Admin | Updated: July 20, 2015 03:59 IST2015-07-20T03:59:46+5:302015-07-20T03:59:46+5:30

हिंजवडीमध्ये वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे. तसेच वाहनचालकांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हिंजवडीतील वाहतूककोंडी अद्याप सुटलेलीच नाही

When to get rid of traffic? | वाहतूककोंडीतून सुटका होणार कधी?

वाहतूककोंडीतून सुटका होणार कधी?

पिंपरी : हिंजवडीमध्ये वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे. तसेच वाहनचालकांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हिंजवडीतील वाहतूककोंडी अद्याप सुटलेलीच नाही.
औंध-हिंजवडी या रस्त्याने हिंजवडीकडे जाणाऱ्या मानकर चौकापासून वाहतूककोंडीला सुरुवात होते. या चौकात काळेवाडी फाट्यापासून एक रस्ता येतो. काळेवाडी फाटा ते मानकर चौकादरम्यान रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्यावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे.
या चौकाप्रमाणेच वाकड चौकातही वाहनांची वर्दळ असते. या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. परंतु त्याचा विशेष वापर केला जात नाही. वाकड चौकातून मुंबई-बंगळुरू उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. परंतु तोच चुकीच्या पद्धतीने उभारल्याने वाहतूककोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
तसेच अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत. येथे वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे ते खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा खड्डा पाहून चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात.

हिंजवडी : शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या चौकात पुण्याकडून डांगे चौकाकडून वाहने मोठ्या प्रमाणात येतात. त्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अवघे दोनच पोलीस असतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचे काम व्यवस्थित करता येत नाही. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
वाकड : वाकड हिंजवडी उड्डाण पुलानजीक नव्याने बांधण्यात आलेला भुयारी मार्ग खुला करण्यात आला आहे. पण त्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. या ठिकाणचा वापर करण्याची सक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे.
या ठिकाणी पीएमपी बसची वारंवारिता कमी आहे. अनेक मार्गांवर बस नाहीत. त्यामुळे खासगी
वाहनांचा वापर केला जातो.
त्यामुळे वाहनांची संख्या वाढून कोंडीमध्ये भर पडते. या ठिकाणी पीएमपीच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
निगडी : आकुर्डी गावठाणातील पांढरकरवस्ती चौकामध्ये वारंवार वाहतूककोंडी होत आहे. या ठिकाणी भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. येथील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावठाणातील अंतर्गत सेवारस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. या रस्त्यावरून नोकरदार, विद्यार्थी, पालक यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पादचाऱ्यांनाही चालणे अवघड होते. अनेकदा येथे वाहनाचा धक्का लागून किरकोळ अपघात होतात. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गलथान प्रशासनामुळे कोंडी
रहाटणी : पिंपळे सौदागर परिसरात पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ‘नो पार्किंग’ असतानासुद्धा चौकात वाहने उभी केली जातात. अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यामुळे या चौकातील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.
शिवार चौकातून कुणाल आयकॉन रस्ता किंवा कोकणे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध अशी मोठमोठे दुकान आहेत. परंतु या दुकानांसमोर वाहने पार्किंगसाठी जागा आहे. पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने परवानगी देताना पार्किंगची जागा आहे किंवा नाही,
पार्किंगच्या जागा इतर व्यावसायिकांना भाड्याने देऊन दुकानदार डबल कमाई करीत आहेत. परंतु पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही सर्व वाहने सर्रास रस्त्यावर पार्किंग करीत आहेत. यामुळे विविध साहित्य, खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने बिनधास्तपणे रस्त्यावरच लावतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
या वाहतूककोंडीकडे पोलिसांनाही लक्ष द्यायला वेळ नाही. अनेक वेळा या परिसरात वाहतूक पोलीस येत नसल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने शिवार चौकात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात चारचाकी-दुचाकी वाहने रस्त्यावरच नो पार्किंगमध्ये लावत आहेत. वाहतूक पोलीस याकडे लक्ष देत नाहीत.
शिवार चौक, कोकणे चौक, कुणाल आयकॉन रस्ता या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजंूना वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर
वाहतूक पोलीस कारवाई का करीत नाहीत.
(प्रतिनिधी)

Web Title: When to get rid of traffic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.