आठवडे बाजारात मालाला बेताचाच उठाव

By Admin | Updated: November 14, 2016 02:47 IST2016-11-14T02:47:59+5:302016-11-14T02:47:59+5:30

आठवडे बाजारात मालाला बेताचाच उठाव

Weekly lift in the market | आठवडे बाजारात मालाला बेताचाच उठाव

आठवडे बाजारात मालाला बेताचाच उठाव


तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांची कमतरता रविवारी येथील आठवडे बाजारामध्ये चांगलीच जाणवली. त्यामुळे अनेक नागरिकांना इच्छा असूनही अपेक्षित भाजीपाला खरेदी करता आला नाही. साहजिकच शेतकरी व विक्रेत्यांच्या मालाला बेताचा उठाव होता. अनेक विक्रेत्यांचा नाशवंत असलेला भाजीपाला शिल्लक राहिला. त्यामुळे छोटे - मोठे विक्रेते हताश झालेले पाहावयास मिळाले.
नागरिकांना रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी तळेगाव शहर परिसरात सलग चौथ्या दिवशीही विविध बॅँकांसमोर खातेदारांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती. शहर परिसरातील अनेक एटीएम सेवा केंद्रावर सकाळपासूनच पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चलन काढणाऱ्यांची संख्या जास्त आणि पुरवठा कमी यांमुळे अनेक ठिकाणच्या एटीएममधील पैसे संपल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बहुतेक सहकारी बॅँकांमध्ये पैशांचा तुटवडा होता. त्यामुळे खातेदारांमध्ये नाराजी होती. सुट्या पैशांअभावी नागरिकांचे हाल झाले. बहुतेक ठिकाणची एटीएम सेवा कोलमडली. पोस्ट आॅफिसमध्येही नोटा बदलून घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. अनेक बॅँकांमधील पैसे संपल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली. (वार्ताहर)

Web Title: Weekly lift in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.