खराब वाहिनीमुळे खडकीत पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: October 27, 2015 01:00 IST2015-10-27T01:00:50+5:302015-10-27T01:00:50+5:30
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येथील जुन्या जलवाहिनी खराब होऊन सडल्या आहेत.

खराब वाहिनीमुळे खडकीत पाण्याचा अपव्यय
पिंपरी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येथील जुन्या जलवाहिनी खराब होऊन सडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. खराब वाहिनी बदलून घ्यावी, अशा सूचना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास केली आहे. या संदर्भात बोर्डास लवकरच पत्र देण्यात येणार आहे.
खडकी भागातील पाणी प्रश्नांबाबत चतु:शृंगी येथील वीजवितरण विभागाच्या प्रकाशगड कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या वेळी आमदार विजय काळे, कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक दुर्योधन भापकर, नगरसेविका कार्तिकी हिवरकर, भाजपाचे पदाधिकारी फ्रान्सिस डेव्हिड, अनिल मेहता, अमर देशपांडे, बोर्डाचे वरिष्ठ अभियंता अरुण गोडबोले, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आढारी, उपअभियंता श्रीधर कामत, कनिष्ठ अभियंता सुधीर सोनावणे, तसेच, एमएसईबीचे अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,‘‘खडकीतील सर्व भागांतील पाण्याचा दाब तपासण्यात येणार आहे. त्याचा अहवाल बोर्डास दिला जाईल. खडकीस पूर्ण क्षमतेने आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. येथील जलवाहिन्या १९८६मध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्या खराब होऊन सडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत जिरून वाया जात आहे. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही वाहिनी बदलावी. वाहिन्या बदलल्यास २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिका करणार नाही. तो बोर्डाने करावा. यासह सर्व बाबीचे अहवाल बोर्डास देण्यात येणार आहे.’’ पाणी पुरवठ्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंटने घ्यावी,या मागणीचा पुनरुच्चार अधिकाऱ्यांनी केला. पाणीपुरवठा विभागाकडून अहवाल आल्यानंतर बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. हा खर्च करणे बोर्डास परवडणार नसल्याचे बोर्ड अधिकारी आणि नगरसेवकांनी सांगितले. अनधिकृत नळजोड खंडित करण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग व कॅन्टोन्मेंट बोर्डाने करावी, असा सल्ला आमदार काळे यांनी दिला. (प्रतिनिधी)