भुयारी मार्गात सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 04:16 IST2015-08-03T04:16:12+5:302015-08-03T04:16:12+5:30
शंकरवाडी, कासारवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने हा मार्ग नेहमीच तुंबून राहतो. पावसाळ्यात

भुयारी मार्गात सांडपाणी
पिंपरी : शंकरवाडी, कासारवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने हा मार्ग नेहमीच तुंबून राहतो. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचते. नाइलाजास्तव या घाण पाण्यातूनच वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करावे लागत आहे. घाण पाण्यातून वाहतूक करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरातील वाहनचालक जवळचा मार्ग म्हणून शंकरवाडी येथील रेल्वे मार्गाच्या खालील भुयारातून नागरिक ये-जा करतात. महामार्गाकडे तसेच पिंपरी आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
तीव्र उतारावर भुयारी मार्ग असल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास येथे ग्रेड सेपरेटरमधील पाणी आणि नाल्याचे सांडपाणी जमा होते. हे पाणी जाण्यास वाट नसल्याने ते तेथेच साचून राहते. मोठ्या पावसात गुडघाभर पाणी जमा होते. वाहनांना या घाण पाण्यातून जावे लागते. विशेषत: दुचाकीस्वाराच्या पायांवर आणि गाडीवर सांडपाणी उडते. वेगातील मोटारीमुळे दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडते. सांडपाणी उडणार नाही, याची दक्षता घेत दुचाकीस्वार आणि सायकलस्वार येथून वाहन पुढे नेतात.
भुयारी मार्गाशेजारीच मोठा नाला आहे. नाल्यात हे सांडपाणी जाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सांडपाणी मार्गावरच अनेक दिवस साचून राहते. ऊन आणि वाहनांची ये-जा झाल्याने हे पाणी सुकून जाते. मात्र, अनेक दिवस चिखल तसाच राहतो. चिखलात दुचाकीस्वार घसरून पडतात. काही वाहनचालक हा मार्ग टाळून नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलावरून एक ते दीड किलोमीटर अधिक अंतराचा वळसा घालून ये- जा करतात.
नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेन जाण्यास रस्ता नसल्याने वाहनचालकांना याच भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. हा प्रकार अनेक वर्षांपासून कायम आहे. (प्रतिनिधी)