मनसे इंजिनला हवाय शहराध्यक्ष
By Admin | Updated: July 13, 2015 04:07 IST2015-07-13T04:07:41+5:302015-07-13T04:07:41+5:30
शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीत बदल करीत पक्षात नवी उभारी निर्माण केली आहे. बदलामुळे पक्षातील कार्यकर्ते
_ns.jpg)
मनसे इंजिनला हवाय शहराध्यक्ष
पिंपरी : शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीत बदल करीत पक्षात नवी उभारी निर्माण केली आहे. बदलामुळे पक्षातील कार्यकर्ते नव्या दमाने कामास लागले आहेत. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व करण्याची संधी अद्याप कोणालाच दिली गेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. प्रत्येक जण मनमानी पद्धतीने कार्य करीत असल्याने एकसंधपणा राहिलेला नाही.
सत्तारूढ राष्ट्रवादी कॉँग्रेसने शहराध्यक्ष बदल केल्याने पक्षात जोश संचारला आहे. शिवसेनेने शहरप्रमुख नियुक्त करीत युवा नेतृत्वावर जबाबदारी दिली आहे. भाजपाचे कामकाज शहरात वेगात सुरू आहे. मरगळ आलेल्या कॉँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलल्यानंतर अंतर्गत वाद उफाळून आले. अशी परिस्थिती असतानाही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने व कार्यक्रम राबविले जात आहेत. भारतीय रिपब्लिकन पार्टी (आठवले) गटाच्या शहराध्यक्ष पदावरून वाद असले, तरी मोर्चे व आंदोलने कायम आहेत. मात्र, शहर मनसेमध्ये उलट स्थिती आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहराध्यक्ष बदलण्यात येणार असल्याचे संकेत वरिष्ठांनी दिले होते. फेबु्रवारी महिन्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे शहराध्यक्ष निवड होईल, अशी आशा बळावली होती. शहराध्यक्षांच्या शर्तीमध्ये असलेले पदाधिकारी ठाकरे यांना मुंबईत जाऊन भेटून आल्यानंतर शहराध्यक्षाची घोषणा होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली.
शहरात पक्षनेतृत्व, तसेच ठोस कार्यक्रम नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिशाहीन झाले आहेत. अस्तिवात असलेले काही गट आपल्या पद्धतीने कार्य करीत आहेत. छोटे- छोटे कार्यक्रम घेत आपणच पक्षाचे अधिकृत नेते असल्याचे भासविले जात आहे. इतर पक्षांशी सोयीस्करपणे जुळवून घेत कार्यक्रम राबविले जात आहेत. तर, आपण शहराध्यक्षपदावर कायम असल्याचा दावा मनोज साळुंके करत आहेत. कोणाचा अकुंश नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा मार्ग स्वीकारला आहे. (प्रतिनिधी)