भाजपातर्फे विलास मडिगेरी; शीतल शिंदे यांची बंडखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:55 IST2019-03-03T00:55:36+5:302019-03-03T00:55:39+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून नगरसेवक विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज शनिवारी (दि. २) सादर केला.

भाजपातर्फे विलास मडिगेरी; शीतल शिंदे यांची बंडखोरी
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून नगरसेवक विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज शनिवारी (दि. २) सादर केला. त्यामुळे भाजपातील निष्ठावंत गटाचे नगरसेवक शीतल शिंदे यांनीही बंडखोरी करीत उमेदवारीअर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे यांनी अर्ज दाखल केला असला, तरी शीतल शिंदे यांना राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मडिगेरी यांच्या उमेदवारीवरून भाजपा निष्ठावंतांमध्ये दोन गट पडल्याने अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
महापालिकेत सत्तेत आल्यानंतरचे भाजपाचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. स्थायी समिती सदस्यासाठी दर वर्षी १० नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी जाहीर केले होते. मात्र, या वर्षी स्थायी समिती सदस्यांमध्ये फेरबदल केला नाही. उलट विलास मडिगेरी यांना दुसऱ्या वर्षी स्थायी समिती सदस्यपदाची संधी देत अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पक्षाकडून पुढे आले. त्यामुळे भाजपातील धूसफूस बाहेर आली. निष्ठावान गटाचे शीतल शिंदे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला. भाजपात बंडखोरी झाल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शिंदे यांना पाठिंबा
देणार असल्याचे जाहीर केले. या वेळी उपमहापौर सचिन चिंचवडे,
नगरसेवक राजू मिसाळ, पंकज भालेकर, मयूर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
स्थायी अध्यक्षपदासाठी भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक शीतल शिंदे व आरती चोंधे इच्छुक होते. तसेच, भोसरी विधानसभा मतदारसंघातील संतोष लोंढे व विलास मडिगेरी यांची नावे इच्छुकांमध्ये होती. पक्षश्रेष्ठींकडून सुरुवातीला शीतल शिंदे यांचे नाव पुढे केले जात असले, तरी आतून विलास मडिगेरी यांना पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांमध्ये दोन गट पडले आहेत.
>चिंचवड, भोसरी आमदारांसाठी धक्कातंत्र
पिंपरी : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विलास मडिगेरी यांची उमेदवारी निश्चित करून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि निरीक्षक व आमदार सुजित ठाकूर यांनी भोसरी व चिंचवडच्या नेत्यांना धक्का दिला आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे दोघेही उमेदवारीअर्ज भरताना गैरहजर होते.
भाजपा सत्तेत आल्यानंतर पहिले दोन स्थायी समिती अध्यक्ष आमदार जगतापसमर्थक आणि महापौर हे आमदार लांडगे यांचे समर्थक होते. तिसऱ्या वर्षी स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी भोसरीतील संतोष लोंढे यांना देण्याची मागणी लांडगे समर्थकांनी केली होती. तसेच, जगताप यांच्याकडून शीतल शिंदे व आरती चोंधे यांची नावे पुढे आली होती. मात्र, दोन्ही गटांना बरोबर घेऊन गतवर्षी स्थायी समितीचा कारभार करणारे विलास मडिगेरी यांना संधी मिळाली. त्यामुळे निष्ठावानांमध्ये शीतल शिंदे व मडिगेरी असे दोन गट पडले आहेत.
>भाजपा धोरणाला हरताळ
आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समितीवर दर वर्षी १० सदस्य याप्रमाणे पाच वर्षांत ५० जणांना संधी देण्याचे भाजपाचे धोरण जाहीर केले होते. मात्र, यंदा या धोरणाला हरताळ फासत पक्षश्रेष्ठींनी विलास मडिगेरी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे उर्वरित भाजपाचे स्थायी समिती
सदस्य राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे.