पिंपरी :वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार असलेल्या दोन संशयितांना पोलिस काही तासांत अटक करतील. अशा नीच प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त भावना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मी, पोलिस आणि शासन देखील कस्पटे कुटुंबियांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि नातेवाईकांचे सांत्वन केले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पथके तयार करून वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक केली. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. २२ मे) दुपारी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे वैष्णवीच्या आईवडीलांच्या घरी भेट दिली. त्यावेळी तिच्या आईवडिलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याशीही मंत्री सामंत यांनी चर्चा करून प्रकरणाबाबत माहिती घेतली.
उदय सामंत म्हणाले, वैष्णवीबाबत घडलेली घटना हा निचपणाचा कहर आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. दोन संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधसाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही २६ तासांमध्ये त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास आहे. वैष्णवीबाबत संशयितांनी जो निर्घूणपणा दाखविला आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीचे कृत्य यापुढे कोणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटनांचा परिणाम समाजावर होत असतो. या प्रकरणातील पाच संशयितांव्यतिरिक्त आणखी कोणाचा यात समावेश आहे का, आणखी काही कंगोरे या प्रकरणाला आहेत, याबाबतही तपास करावा, अशी सूचना पोलिसांना केली आहे. पोलिसांच्या तपासाबाबत कस्पटे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पोलिसही काम करत आहेत.
‘‘नीचपणाचा कळस...’’
पैसे, गाडी, मोबाइल मिळाला नाही म्हणून घरात छळ करणारे आणि बाहेर दुनियाचे कैवारी म्हणून फिरत असतात हा नीचपणाचा कळस आहे. कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असला तरी त्याला असे कृत्य करण्याचे सर्टिफिकेट दिलेले नाही. कोणत्याही राजकीय व्यक्तीने, नेत्याने असे करू नये, असे उदय सामंत म्हणाले.