पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू-सासरे, नवरा, दीर व नणंदेला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि रूपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्याचे कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यामुळे हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली असून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाही तर सुपेकर हे जळगाव येथे कार्यरत असताना तेथील पोलिस उपनिरीक्षक अ. गो. सादरे यांनी सुपेकर यांनीच त्रास दिल्याचे पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्या प्रकरणावरही पुढे पडदा पडला, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नाही. मलाही दोन मुली असून, अशा गंभीर अन् निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हायलाच हवी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. - डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र