पिंपरी : वैष्णवी हगवणे प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी शनिवारी एक कार, दोन पिस्तूल आणि लग्नात दिलेली चांदीची भांडी देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. तसेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शशांक आणि सुशील यांच्याकडील दोन पिस्तूल जप्त केले. पुणे शहर पोलिसांकडून या दोघांना पिस्तूल परवाना देण्यात आला होता. त्यामुळे पुणे शहर पोलिसांकडून या दोघांच्या पिस्तूल परवाना जप्तीची नोटीस बजावण्यात आली.
दरम्यान, बावधन पोलिसांनी याप्रकरणी १७ मे राजी गुन्हा दाखल करून वैष्णवी हिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक केली होती. मात्र, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे दोघेही फरार होते. पोलिसांची सहा पथके त्यांच्या मागावर होती. अखेर बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि. २३ मे) पुणे शहरातून राजेंद्र आणि सुशील या पितापुत्राला अटक केली. त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यात पोलिसांनी शुक्रवारपर्यंत दोन कार, एक दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली होती. त्यापाठोपाठ शनिवारी देखील एक कार, चांदीची भांडी, दोन पिस्तूल जप्त केले आहेत. याप्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
लग्नात दिली होती चांदीची भांडी
वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. त्यानुसार लग्नात चांदीची भांडी दिली, असे वैष्णवीच्या आईवडिलांनी सांगितले होते. पोलिसांनी हीच चांदीची भांडी जप्त केली आहेत.
नीलेश चव्हाणच्या मागावर तीन पथके
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेला नीलेश चव्हाण हा फरार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.