पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे.
लुक आऊट नोटीस म्हणजे काय?लुक आऊट नोटीस (LOC) म्हणजे एखादा संशयित व्यक्ती देशाबाहेर जाऊ नये म्हणून विमानतळ आणि बंदर अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देणे. निलेश चव्हाण देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.