वैष्णव विचार मंडळास प्रथम स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:45 IST2016-02-29T00:45:57+5:302016-02-29T00:45:57+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मायबोली शब्दोत्सव-२०१६’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे

वैष्णव विचार मंडळास प्रथम स्थान
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मायबोली शब्दोत्सव-२०१६’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक भोसरीतील वैष्णव विचार मंडळाने पटकाविले.
उद्घाटन शनिवारी क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘फ’ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बोऱ्हाडे, नगरसेवक नितीन लांडगे, गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, शिक्षण मंडळ उपसभापती नाना शिवले, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त योगेश कडुसकर, प्रशासन अधिकारी विठ्ठल बेंडे आदी उपस्थित होते.
भजन स्पर्धेत एकूण १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भोसरीतील वैष्णव विचार मंडळ प्रथम, दिवगंत नामदेव माने महिला भजनी मंडळ द्वितीय, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ज्ञानेश फाउंडेशन महिला भजनी मंडळ यांनी पटकाविले. उत्कृष्ट गायक गायत्री थोरबोल, उत्कृष्ट तबला वादक विजय धावडे, उत्कृष्ट पखवाजवादक सचिन खानेकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक इंद्रायणी गडकर आणि उत्कृष्ट टाळवादक संगीता रणपिसे यांना सन्मानित करण्यात आले.
एचए माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘सोहम् शोध स्वत:चा’ ही नाटिका सादर केली. विनोद सुतार आणि सहकारी यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. गोरक्ष लोखंडे यांनी ‘नटसम्राट’ या नाटकामधील संवादाचा नाट्य अभिनय सादर केला. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख अविनाश सांगोलेकर यांचे ‘मराठी भाषा विकास आणि संवर्धन’ या विषयावर व्याख्यान झाले. पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी असली, तरी मराठी भाषेवर प्रेम करणारी नगरी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी झालेल्या क विसंमेलनामध्ये शहरातील अनेक कवींनी भाग घेतला होता. गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, दत्ता हगवणे, अनघा पाठक, सुभाष चटणे, सुरेखा कुलकर्णी, मधुश्री ओव्हाळ, किशोर परदेशी या कवींनी कविता सादर केल्या. या कवींनी विशेषत: मराठी भाषा समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या विषयांकित कविता सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.
प्रास्ताविक अरुण बोऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचलन रमेश भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)