अनधिकृत मंदिर भुईसपाट; ठेकेदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:30 IST2019-02-22T00:29:44+5:302019-02-22T00:30:15+5:30
पिंपळे गुरव येथील दुर्घटना : चौकशी अहवालानंतर अधिकारी रडारवर

अनधिकृत मंदिर भुईसपाट; ठेकेदारावर गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले. याप्रकरणी मजुरांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली नाही, म्हणून मंदिर बांधकामाचा ठेका घेतलेल्या राहुल जयप्रकाश जगताप (वय ३६, रा. बारामती) यांच्यावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठी मंदिराचे सुरू असलेले बांधकाम अनधिकृत असल्याबद्दल महापालिकेच्या बांधकाम परवाना व अतिक्रमण निर्मूलन विभागाने नोटिशीद्वारे कळविले होते. संबंधित बांधकाम पाडून टाकण्याबाबत १६ नोव्हेंबर २०१८ला महापालिकेने नोटीस बजावली होती. तरीही ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना काम सुरू ठेवले होते. मजुरांना सेफ्टी बेल्ट, सेफ्टी बूट, सुरक्षा जाळी अशी कोणतीही सुरक्षासाधने पुरविण्यात आली नव्हती. ही बाब निदर्शनास आल्याने मजुरांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी ठेकेदार जगताप यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळे गुरव येथे मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मनतोष संजीव
दास (वय ३०, रा. कामगार वसाहत, पिंपळे गुरव), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५, कामगार वसाहत), सिद्धम्मा मानसप्पा पुजारी (वय ३०, रा. गोपीचाळ, खडकी) या कामगारांचा समावेश आहे.
शामोन सरदार, सेवाराम राजकुमार साहू, कृष्णा पवार, कमलेश कांबळे, आयप्पा मल्या सुभंड, धनंजय चंदू धोत्रे, योगेश मच्छिंद्र मासाळकर, कमलेश मालिकराम, अयप्पा मलप्पा सुगड हे मजूर दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम, तसेच औंध येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडून येत आहे.
पिंपरी : पिंपळे गुरव येथील मंदिराचा सभामंडप कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार राहुल जगताप याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंदिराचे बांधकाम भुईसपाट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मंदिराचे काम सुरू असताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नोव्हेंबर महिन्यातच चोवीस तासांत बांधकाम काढून घ्यावे, अशी नोटीस दिली होती. तरीही बांधकाम सुरू होते. बुधवारी मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गुरुवारी दुपारी दोनला कारवाई केली. मंदिराचे बांधकाम पाडले. मंदिराचे क्षेत्रफळ हे ११०० चौरस फुटांचे असून, दोन जेसीबी, एक पोकलेन, दहा मनपा अधिकारी आणि १० पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.