पिंपरी: शिवसेनाउद्धव ठाकरे गटात अस्वस्थता असून गळती लागली आहे. शिरूर लोकसभेच्या जिल्हा संघटिका, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर शिवबंधन तोडले. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाळे गटाने प्रवेश केला आहे.
काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत शहरात एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्याचरोबर विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेला फटका बसला. त्यामुळे ठाकरे गटात तीव्र नाराजी दिसून येत आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीपूर्वी मोरेश्वर भोंडवे यांनी शिवबंधन बांधले होते. मात्र, उमेदवारी न दिल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रभारी शहरप्रमुख म्हणून संजोग वाघेरे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.
नाराजांना शिंदे सेनेत
ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराजांना एकत्र करून शिंदेसेनेत आणण्याची खेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडनून खेळली जात आहे. त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. उबाळे यांच्या पक्षांतराची चर्चा तीन महिन्यांपासून होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
अत्यंत चुरशीची दिली लढत !
यमुनानगर महिला मंडळ, दामिनी ब्रिगेड, तसेच बचत गटांच्या माध्यमातून सुलभा उबाळे यांनी मोठे काम केले. महापालिकेत १९९७ च्या निवडणुकित सर्वसाधारण जागेवर नगरसेविका विजयी झाल्या. तीन वेळा महापालिकेत नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केले. हवेली तालुक्याचे विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारंघातून तत्कालिन आमदार विलास लांडे यांच्याशी त्यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली आणि अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पुढे २०१४ मध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांचा पराभव झाला.