पिंपरी : एक्सपायरी झालेले कुरकुरे खाल्ल्याने एका व्यक्तीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याचे दुकानदाराला सांगितले. हे प्रकरण मिटविण्यासाठी व तक्रार न करण्यासाठी दुकानदाराकडून अडीच लाख रुपये घेतले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी तिघांना अटक केली. तळवडे येथे सोमवारी (दि. १३) आणि मंगळवारी (दि. १४) ही घटना घडली.
भूषण पंढरीनाथ पाटील (वय २७), राहुल सुभाष पाटील (२२), सुभाष चंपालाल पाटील (५१, तिघे रा. तळवडे, मूळगाव वाघळूद खुर्द, ता. धरणगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किराणा दुकानदार रमेशकुमार लालाराम चौधरी (३७, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशकुमार चौधरी यांचे तळवडे येथे किराणा दुकान आहे. या दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे संशयितांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलावून दुकान बंद करण्याची चौधरी यांना धमकी दिली. तसेच चौधरी यांना शिवीगाळ करून हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे चौधरी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.
दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने सापळा लावला. त्यावेळी तडजोड करून अडीच लाख रुपये स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी संशयिताना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक उपनिरीक्षक अमर राऊत, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुराडे, मंगेश जाधव, किरण जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.