तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची आज सांगता

By Admin | Updated: August 10, 2015 02:54 IST2015-08-10T02:54:07+5:302015-08-10T02:54:07+5:30

विठुरायाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी पिंपरीत प्रवेशला. मोहक फुलांची बरसात

Tukobaraya's Palkhi celebrations today | तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची आज सांगता

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची आज सांगता

पिंपरी : विठुरायाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी पिंपरीत प्रवेशला. मोहक फुलांची बरसात, टाळ-मृदंगासह हरिनामाचा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळी सातला पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारी वीणेकरी, दिंडीकरी, मानकरी यांचा सत्कार होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
या वेळी जोगमहाराज दिंडी आणि पिंपरी गावातील भजनी मंडळाचे वारकरी पालखी सोहळ्याच्या स्वागतास गावाच्या सीमेवर आले होते. त्या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी सहभागी झाली होती. तसेच, गावात पालखी सोहळ्याचे स्वागत करणाऱ्या कमानी लक्षवेधी होत्या, तर गावातील पालखी मार्गावर रांगोळी आणि झेंडूच्या फुलांची रांगोळी काढली होती. सोहळ्यासमोर ओम साई प्रतिष्ठान, सह्याद्री ढोलपथक, शिवतांडव ढोलपथकांचा दणदणाट सुरू होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर, गावातून पालखी जात असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी केली जात होती. त्यानंतर सायंकाळी सहाला पिंपरी गावातील काळभैरवनाथ मंदिर येथे अभंगारतीनंतर पालखी मुक्कामासाठी थांबली. या वेळी पिंपरीकरांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. सोमवारी सकाळी सोहळा श्रीक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होणार आहे.
वारकऱ्यांची सेवा
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्याबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अ‍ॅम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tukobaraya's Palkhi celebrations today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.