विकासकामांचा होतोय नागरिकांना त्रास
By Admin | Updated: March 1, 2016 00:57 IST2016-03-01T00:57:48+5:302016-03-01T00:57:48+5:30
विकासकामांच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. चिंचवडमधील दळवीनगर प्रभागातील इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन परिसरात भूमिगत

विकासकामांचा होतोय नागरिकांना त्रास
चिंचवड : विकासकामांच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. चिंचवडमधील दळवीनगर प्रभागातील इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन परिसरात भूमिगत केबल व पादचारी मार्गाचे काम रखडले आहे. कामाचा राडारोडा व अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात वारंवार कामे केली जातात. मात्र, या कामांचे नियोजन नसल्याने ती अर्धवट राहतात. गेल्या दीड महिन्यापासून इंदिरानगर, प्रेमलोक पार्क परिसरातील रस्ते भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले. मात्र, ते पूर्ववत करण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडला आहे. या कामाचा राडारोडा त्रासदायक ठरत आहे.
कित्येक वर्षांनंतर या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आले. मात्र, नुकतेच केलेले रस्ते केबलच्या कामासाठी पुन्हा खोदण्यात आले. प्रशासनाच्या या पद्धतीबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. प्रेमलोक पार्क, इंदिरानगर परिसरातील विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील रहिवाशी संतप्त झाले आहेत. हाती घेतलेली कामे पूर्ण करावीत व अर्धवट असलेले पादचारी मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)