खिळेमुक्तीसाठी सरसावले वृक्षप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:37 IST2018-04-10T01:37:41+5:302018-04-10T01:37:41+5:30
जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.

खिळेमुक्तीसाठी सरसावले वृक्षप्रेमी
रावेत : जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.
त्यासाठी खिळेमुक्त झाडे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी (दि. ८) ७० झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. दोन किलो खिळे काढून झाडांना वेदनामुक्त करण्यात आले.
शहरात खिळेमुक्त झाडे, ‘नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री’ या अभियानांतर्गत ‘मी पाणी अंघोळीची गोळी’ यांच्या वतीने निगडी प्राधिकरणातील भेळ चौक ते काचघर चौक मार्गावर असणाऱ्या झाडांचे जवळपास दोन किलो खिळे काढले. प्रत्येक मंगळवारी चालणाºया या अभियानाची प्रेरणा घेऊन कै़ तुकाराम प्रतिष्ठानने हाच उपक्रम रविवारीसुद्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘अंघोळीची गोळी’मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. संभाजीनगर येथील ३८ झाडांना खिळेमुक्त केले आणि झाडांच्या संवर्धनाची आणि संवेदनांची गुढी उभारली. झाडांचे आयुष्य वाढविण्याच्या उद्देशाने झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी ‘खिळेमुक्त झाडे’ असे या उपक्रमाचे नाव असून याद्वारे शहरातील झाडे खिळेमुक्त केली जाणार आहेत. झाडांना वेदनामुक्त करण्याचा छोटा पण एक प्रामाणिक प्रयत्न आंघोळीची गोळी ह्यूमन सोसायटी, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटना, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, यांचे ४० सभासद सहभागी झाले. त्यात दोन तास हा उपक्रम करण्यात आला. त्यात ३२ झाडे खिळेमुक्त करण्यात आले.
महादेव पाटील, अनिल पालकर, अशोक तनपुरे, संदीप सकपाळ, लक्ष्मण शिंदे, नितीन मोरे, नकुल टळले, फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अरुण पाटील, बंटी सकपाळ, स्वाती पालकर, उल्हास टाकले, सूर्यकांत मूथीयान, समाधान पाटील, विठ्ठल सहाणे
यांनी सहभाग घेतला़ येथून पुढे शहरातील विविध ठिकाणी तुकाराम तनपुरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत खिळेमुक्त झाडे अभियान यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अशोक तनपुरे यांनी सांगितले.
>महापालिका : उद्यान विभाग उदासीन
शहरातील वृक्षांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र महापालिकेचा उद्यान विभाग याबाबत उदासीन आहे. उद्यान विभागाचे अधीक्षक आणि अन्य अधिकारी यांचा वृक्ष संवर्धनात सक्रिय सहभाग दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचवून शहरात वृक्षारोपण केल्याचे सांगण्यात येते. दर वर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यांच्या संवर्धनाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत असतो. झाडांवर खिळे ठोकून जाहिरातबाजी केली जात असतानाही उद्यान विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
सामान्यांच्या सहभागाची गरज
वृक्षसंवर्धनाची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नसून शहरवासीयांचीही आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील झाडांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे निगा राखणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनी स्वत: पुढाकार घेत झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन वृक्षपे्रमींकडून करण्यात येत आहे.
कारवाईची मागणी
शहरातील झाडांवर जाहिरात फलक लावण्यात येतात. त्यासाठी झाडांना खिळे ठोकून त्यांना वेदना पोहोचविण्यात येतात. या प्रकारामुळे शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. त्यामुळे अशा जाहिराती करणाºया दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृक्षपे्रमींकडून होत आहे.