गतिरोधकामुळे प्रवासी रुग्णालयात
By Admin | Updated: September 24, 2015 03:03 IST2015-09-24T03:03:43+5:302015-09-24T03:03:43+5:30
भरधाव बस नियंत्रणात न आल्याने स्पीड ब्रेकरवर बस आदळली. त्यात मागील सीटवर बसलेले प्रवासी जखमी झाले. पुढच्या थांब्यावर उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.

गतिरोधकामुळे प्रवासी रुग्णालयात
पिंपरी : भरधाव बस नियंत्रणात न आल्याने स्पीड ब्रेकरवर बस आदळली. त्यात मागील सीटवर बसलेले प्रवासी जखमी झाले. पुढच्या थांब्यावर उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.
वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी मुलगी सोनम साह तिच्या सासू-सासऱ्यांबरोबर चिंचवडला आली. तेथून गणपती दर्शनाला कात्रजला जाणाऱ्या बीआरटी बसने (एमएच १४ सीएन ३०२३) पुण्यात जात असताना जगताप डेअरी, रक्षक चौक येथे बस स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली. बसमध्ये बसलेले साह कुटुंबातील सदस्य जखमी झाले. सोनमची आई मधू, सासू गायत्रीदेवी, सासरे अनिलकुमार आणि छोटा मुलगा यांचा जखमींमध्ये समावेश आहे. याशिवाय बसमधील अन्य प्रवाशांमध्ये काही महाविद्यालयीन युवक आणि युवती होत्या. त्यांच्यापैकी काहींना मुका मार लागला, तर काहींना इजा झाली. बसमधून उतरल्यानंतर त्यांना उपचारासाठी थेट रुग्णालयात धाव घ्यावी लागली. या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांकडे धाव घेतली. परंतु, पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एवढ्याशा कारणासाठी
तक्रार कशाला करता, असे म्हणत तक्रार घेण्यास वाकड पोलिसांनी टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)