वाहतूक पोलीस आहे माणूस

By Admin | Updated: August 6, 2015 03:31 IST2015-08-06T03:31:14+5:302015-08-06T03:31:14+5:30

पिंपरी, निगडी, सांगवी, हिंजवडी आणि भोसरी या पाच विभागांत १७२ कर्मचारी आहेत. सुमारे ४२ कर्मचारी अपुरे असताना त्याकडे गांभीर्याने न पाहता काही झाले

The traffic police is the guy | वाहतूक पोलीस आहे माणूस

वाहतूक पोलीस आहे माणूस

पिंपरी, निगडी, सांगवी, हिंजवडी आणि भोसरी या पाच विभागांत १७२ कर्मचारी आहेत. सुमारे ४२ कर्मचारी अपुरे असताना त्याकडे गांभीर्याने न पाहता काही झाले, तरी वाहतूक सुरळीत असावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली जाते. नेमून दिलेल्या पॉइंटवर पिण्याच्या पाण्याचीही सुविधा मिळत नाही. घशाला कोरड पडली, तरी पॉइंट सोडता येत नाही. काही मिनिटांसाठी बाजूला गेल्यास, आणि त्याच कालावधीतच वाहतुकीची कोंडी अथवा अपघात झाल्यास जबाबदारी वाहतूक पोलिसावरच येते. त्यामुळे पॉइंट सोडण्याचे धाडस पोलीस कर्मचारी करीत नाहीत.
वेळ सकाळी ११ ते दुपारी २ : पिंपरी कॅम्प-चिंचवड-मोरवाडी चौकाकडे जा-ये करण्यासाठी असलेला इंदिरा गांधी पूल. तीन पोलिस थांबलेले. शेजारी एक अधिकृत रिक्षा थांबा. सर्वकाही सुरळीत वाहतूक. दुपारी एक नंतर पोलिस आहेत की नाही याचा अंदाज घेत दुचाकीस्वार कॅम्पाकडून एकेरी मार्ग तोडून येण्याच्या प्रयत्नात; पण नियमातून जाणाऱ्यांपैकी काहीजण पुढे पोलिस आहेत अशा खाणाखुणा करून सावध करत होते. भाटगनरच्या दिशेने मोटारसायकलवर जादा साहित्य घेऊन जाणारे एक-दोन किरकोळ व्यापारी, कोणाचे तरी घरसामान भाड्याने घेऊन जाणारा छोटा हत्ती यांना पोलिसांनी अडविले. पावती केली. पोलिस सव्वाच्या सुमारास निघून गेले आणि वाहतूक नियम बासनात गुंडाळून चालकांनी आपापली वाहने दामटायला सुरूवात केली.
तळवडे, त्रिवेणीनगर चौक : तळवडेकडून निगडीतील टिळक चौकाच्या दिशेने दुचाकी जात होती. नंबरप्लेट नसल्याने पोलिसाने ती कडेला घ्यायला लावली. परवान्याची मागणी करीत दंड पावतीचे पुस्तक घेऊन पोलीस दुचाकीचालकाकडे गेला. मात्र, पावती तयार करण्यापूर्वीच चालकाने रुबाबात आपला मोबाईल पोलिसाला देत ‘बोला’ असा आदेशच दिला. फोनवरून बोलणे झाले आणि पोलिसाने चालकाला विनाकारवाई सोडून दिले. असे चित्र पाचवेळा पहायला मिळाले.
हिंजवडीतील भूमकर चौक : हिंजवडीत वाहतुकीचा प्रश्न मात्र सर्वात गहन असल्याने लाखोंच्या संख्येने वाहणाऱ्या वाहनांचे नियमन करता-करता हिंजवडी वाहतूक पोलिस कर्मचारी मेटाकुटीस आलेले. अंगावर रेनकोट नाही. वाकड-हिंजवडी परिसरातील कोणत्याही चौकात पोलिस बूथ किंवा थांबण्याची सोय नाही. शिवाजी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीचा आधार वाहतूक पोलिस घेतात तर डांगेचौकातील कर्मचारी नाईलाजाने पुलाखाली थांबतात. मुंबई-बंगळूर महामार्ग यामुळे येथील डांगे चौक, हिंजवडीतील शिवाजीचौक, भूमकर चौक, आयटी पार्क फेज दोनमधील विप्रो सर्कल, मेझानाईन चौक, जॉमेट्रिक सर्कल आदी चौक सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी.
अनेकदा होतात वाद : आम्ही इथलेच गाववाले आहोत असे म्हणत या भागातील बहुतेक स्थानिक रहिवासी नियमांची पायामली करीत पोलिसांबरोबर उद्धट वर्तन करतात. अनेकदा हमरी-तुमरी होते चूक असून देखील ती मान्य न केल्याने वाद होतात आणि यातून वाहतुकीचाही खेळ खेळखंडोबा होतो. मात्र रस्त्यावर एकटाच कर्मचारी असल्याने त्यालाच निमूटपाने ऐकून घेत माघार घ्यावी लागते. तर काहीवेळा राजकीय पुढारयांची देखील शहाणपणाची भाषा फोनद्वारे पोलिसांना ऐकून घायवी लागते. मात्र अधिकारी जवळपास असल्यास अशा लोकांवरती कारवाईदेखील केली जाते.
पावती फाडणे, पैसे फेकण्याची मानसिकता :
कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत जाणून घेताना असे आढळून आले की नागरिक तक्रार न नोंदविता दंडाची पावती फाडून या प्रकरणातून निसटून पळ काढण्याची भूमिका घेतात.अशाच वाहतूक पोलिसांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, नागरिक पावती फाडा लवकर जाऊ द्या, अशा अरेरावीच्या भाषेत बोलताना दिसतात. वास्तविक पाहता प्रत्येक वेळी पावती फाडणे आवश्यकच आहे असे नसते. पावती फाडताना विविध नियम आहेत. त्यातही मध्यमवर्गीयापेक्षा उच्च मध्यमवर्गीयांचा याबाबत दृष्टिकोन हा मागास आहे असे आढळून आले. असाच एक अनुभव वाहतूक पोलीस सांगताना उच्च मध्यमवर्गीय लोकांची वाहतूक पोलिसांना मिळत असलेली तुच्छ वागणूक लक्षात येते. चारचाकी असलेल्या उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती मोबाईलवर बोलत मोटार वेगात चालवत होता. त्यात त्याने सिग्नल तोडल्यावर वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. ती व्यक्ती वाहतूक पोलिसांनाच दम देऊ लागली. मी कुणाशी बोलतो आहे माहित आहे का? तेव्हा पोलिसांनी उत्तर दिले की नाही कुणाशी बोलत आहात? तेव्हा मी तुमच्याच आयुक्तांशी बोलत आहे. तेव्हा फोन देऊ का? पोलिसांनी फोन द्या म्हटल्यावर मात्र, याने फोन लागत नाही, असे सांगितले. तेव्हा आता फोनवरच आयुक्तांशी बोलायचे आहे, तुम्ही दंड भरू नका असे म्हटले असता ती व्यक्ती लगेचच दंड भरायला मुकाट्याने तयार झाली. अशी पावती घेऊन ती उद्धटपणे फाडून फेकून दिली. जवळच थांबलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पाहिले. त्यांना पुढे जाऊन दिले. आणि पुन्हा मोटार राखत त्याला दंडाची पावती मागितले. पावती फाडल्याचे सांगत ती व्यक्ती ओशाळली. असा पद्धतीने न वागण्याचा सल्ला अधिकाऱ्यांने त्याला देत त्याला सोडून दिले.
ठाण्यात सुविधांचा अभाव
शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, सांगवी, हिंजवडी हे सहा विभाग आहेत. या विभागात सुमारे ५० महिला अधिकारी व पोलीस आहेत. पोलीस ठाण्याप्रमाणे येथे सुविधा नाहीत. एखाद्या रस्त्याकडेला बहुतेक ठाणे आहेत. त्यात छोटीशी केबिन असते. सर्व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अभावाने आढळते. वरिष्ठांचे केबिन चांगले दिसत असले तरी, ते आकाराने खूपच छोटे आहे. वरिष्ठांची ही गत तर, कर्मचाऱ्यांच्या केबिनची विचारायची सोय नाही. बसण्यासाठी पुरेसे संख्येने खुर्च्या नाहीत. भोसरी, सांगवी ठाणे रस्त्यावर आहे. तर, हिंजवडी ठाणे पुलाखाली आहे. इतर ठाणी दाटीवाटीत आणि अपुऱ्या जागेत आहेत. घरापासून अधिक वेळ कामावर असल्या कारणाने आराम करण्यासाठी कक्षात बेड नाहीत.
अगोदर अरुंद केबिन त्यांत महिलांसाठी स्वतंत्र कक्षाचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यासाठी स्वतंत्र सुविधा कोठेच नाहीत. पुरुष कक्षातच त्यांना आराम करावा लागतो. त्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. दुपारच्या काळात विसावा घेता येत नाही. काही ठिकाणी पंखे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात घामाच्या धारा निघतात. असा अवस्थेत काम करावे लागते. पावसाळ्यात अनेक कार्यालयात पाणी गळते. निगडी कार्यालयातील भितीमध्ये ओल पसरुन कुंबट वास सर्वत्र असतो. याच दुर्गंधीत दिवसभर काम करावे लागते. याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. याच मानसिकतेखाली दिवस ढकलावा लागतो.
केवळ काम करा, कार्यालयाचे तुमचे तुम्ही पाहा, असे आदेश वरुन दिला जातो. सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींचे सहाय घेऊन ठाण्यात सुविधा पुरवाव्या लागतात. यासाठी पुरस्कर्त शोधत दारोदारी फिरावे लागते. हिंजवडी आयटी पार्कमध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुविधा देतात. त्यामुळे त्यांची मानसिकता उत्साहवर्धक असते. मात्र, तेथीलच पोलिसांना वर्दळीच्या ठिकाणी महामार्गावरील ठाण्यात काम करावे लागते. प्रतिकुल वातावरणामुळे कार्यक्षमेवर परिणाम होतो.
आजारपणात उभे राहून काम करणे कष्टप्रद
१आजारी, अशक्त असला तरी, चौकात थांबून काम करण्याची सक्ती केली जाते. अगोदर मनुष्यबळ कमी असल्याने सुट्या लवकर दिल्या जात नाहीत. अनेकदा त्या नाकारल्या जातात. याचा मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. रस्तावरील वाहनांचा धूर, कर्कश्श आवाज, गोंगाट, वाऱ्यासोबत धुळ, उन्ह पाऊस, थंडीमुळे अनेक आजार बळावतात. डोळ्याचे आजार, त्वचारोग, कर्णबधीरता, केस गळणे, श्वसनाचे आजार जडतात. कायम उभे राहून काम केल्याने पायांना
गोळे येतात. रक्तगाठी तयार होतात. एकादा आजार जडले की, उपचारांसाठी धावपळ करावी लागतो. खर्च वाढतो. त्रास वाचविण्यासाठी अनेक कर्मचारी व्यसनाच्या आहारी जातात.
२गरोदरपण असतानाही महिला आठव्या ते नवव्या महिन्यांपर्यंत काम करतात. अगदी डिलिव्हरीच्या काही तास आधीही महिला पोलीस दवाखान्यात दाखल झाल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. यामुळे असा महिलांवर अतिरिक्त ताण येतो. शरीर साथ देत नसतानाही कर्तव्य करावे लागते. सतत काम करीत राहिल्याने पोलिसांना कामाचा ताण येत आहे. कौटुुंबिक समस्येच्या वेळी सुट्ट्या मिळत नाहीत, वरिष्ठांची बोलणी सहन करावी लागते. वर्षातून केवळ ४५ दिवस सुट्टया दिल्या जातात. काही संकटकालीन समयी सुट्टीची आवश्यक्ता असताना सुट्टी न मिळणे, यामुळे त्यांचे मन:स्वास्थ्य ढासळत चालले आहे. ‘‘कर्मचाऱ्यांना नियमानुसार सुट्या दिल्या जातात. तसेच, वेगवेगळ्या सुट्यीचे लाभ दिले जातात. महिलांना गरोदरपणाच्या काळातील सुट््टीचा लाभ मिळतो,’’असे अधिकाऱ्यांचे मत आहे.
स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा
चौकात उभे राहून वाहतूक नियमन करताना तसेच, बंदोबस्त काळात स्वच्छतागृहाअभावी पोलिसांची कुचंबणा होते. विशेषता महिला कर्मचाऱ्यांची अधिक गैरसोय होते. वर्दळीच्या काळात चौक सोडून जाता न येणे. तासन् तास ड्युटीच्या ठिकाणी थांबावे लागते. वरिष्ठांना याबाबत विचारणा करणे ही महिलांना शरमेची बाब वाटते. जवळपास स्वच्छतागृह नसल्याने चौकातून हलता येत नाही.
चौकात स्वच्छतागृह असले तरी, ते प्रचंड अस्वच्छ असतात. यामुळे पोटदुखीचे तसेच, इतर आजार बळावतात. नाईलास्तव चौकातील एकाद्या हॉटेल किंवा घरातील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. याच प्रकार कार्यालयातही (ठाणे) अनेकदा घडतो. प्रत्येक कार्यालयात पुरेसे स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
सलग ड्युटीने ताण
आंदोलन आणि दगडफेक प्रकरणी बोपखेलमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक महिला पोलिसांनाही या वेळी दिवस व रात्रपाळीची असा सलग ड्युटी लावली गेली होती. तसेच गणेशोत्सव, दहीहंडी, रंगपंचमी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सार्वत्रिक निवडणुका अशा कारणासाठी सलग १० ते १५ दिवसांची ड्युटी करावी लागते. सण-उत्सवात बंदोबस्तसाठी लांबच्या ठिकाणी नेमणूक दिली जाते. नाकाबंदी, शहरात नेत्यांचे दौरे, निवडणूका, अपघात अशा वेळी सतत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असतो.

Web Title: The traffic police is the guy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.