मंजुरीसाठी कोट्यवधींचे विषय
By Admin | Updated: August 11, 2015 03:51 IST2015-08-11T03:51:05+5:302015-08-11T03:51:05+5:30
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करणे, डेंग्यूबाबत उपाययोजना करणे, पाणीपुरवठ्याच्या नवीन वाहिन्या टाकणे, संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती

मंजुरीसाठी कोट्यवधींचे विषय
पिंपरी : अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करणे, डेंग्यूबाबत उपाययोजना करणे, पाणीपुरवठ्याच्या नवीन वाहिन्या टाकणे, संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, रस्ते विकासकामे असे कोट्यवधींचे विषय मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार आहे. ३१ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात साहित्य खरेदीसह स्थापत्य विभागाचे विषय अधिक आहेत. या विषयांत वादग्रस्त आणि तहकूब विषयांची संख्या अधिक आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी यंत्रणा खरेदीचे चार विषय समितीसमोर आहेत. दिघी प्रभाग, अ प्रभागातील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या खरेदीसाठी सव्वा कोटी रुपयांच्या खरेदीचा विषय समितीसमोर आहे.
चऱ्होली -पुणे-आळंदी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ६ लाख, ७६ हजार ६७५ रुपये, संभाजी चौक ते म्हाळसाकांत रस्त्यावर फुटपाथ करण्यासाठी वीस लाख रुपये, पुनावळे येथील पाण्याच्या टाकीचे आउटलेट बदलण्याचा विषय मंजुरीसाठी समितीसमोर ठेवला आहे. तसेच स्वेच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे खरेदीचा विषयही मंजुरीसाठी ठेवला आहे. (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डॉक्टरची नियुक्ती, लेखापरीक्षण अहवाल करणे, मोशी येथील जलवाहिनी टाकणे, चक्रपाणी वसाहत येथील किरकोळ दुरुस्तीची कामे करणे, वैद्यकीय विभागाकडील वैद्यकीय प्रतिपूर्ती या लेखाशीर्षात तीन कोटींची तरतूद केली आहे. त्यातून अडीच कोटींचा खर्च झालेला आहे. धन्वंतरी योजना सप्टेंबरपासून सुरू झाली. तरीही कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची पूर्वीची बिले अदा करावी लागत आहेत. उपकरण खरेदी या लेखाशीर्षामध्ये वर्ग करण्याचा विषय बैठकीसमोर ठेवला आहे.