पिंपरी : महापालिका ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वल्लभनगर वर्तुळाकार मंडईत साफसफाई करताना सापडलेला नवीन आयफोन सफाई कर्मचाऱ्याने परत केला. सागर डावकर या कामगाराच्या प्रामाणिकतेचे कौतुक पोलिस आणि महापालिकेने केले आहे.वल्लभनगर वर्तुळाकार मंडई येथे साफसफाई करताना डावकर यांना आयफोन सापडला. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ॲड. सागर चरण युवा मंच यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर ॲड. सागर चरण यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल शेटे यांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, पोलिस निरीक्षक शशिकांत गाडेकर यांच्या मदतीने हरवलेल्या फोनचे मालक कोण, याचा शोध घेतला. त्यावेळी ती व्यक्ती हरीश अमृतकर असल्याची माहिती पोलिसांना मिळली. त्यानंतर अमृतकर यांना आयफोन परत देण्यात आला.सफाई कर्मचारी डावकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक पोलिसांनी केले. सत्कार समारंभास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंभार, ॲड. चरण, अनुसूचित जाती-जमाती आणि पिछडावर्ग संघटोचे प्रदेशाध्यक्ष अजिमुद्दीन अन्सारी, विजय वांजळे उपस्थित होते.
सफाई कामगाराची ईमानदारी...! मंडईत सापडलेला आयफोन केला परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:40 IST