शिक्षकांच्या संपाने विद्यार्थी वेठीस
By Admin | Updated: October 28, 2015 01:31 IST2015-10-28T01:31:34+5:302015-10-28T01:31:34+5:30
कला व क्रीडा शिक्षकांबाबतचा राज्य शासनाचा अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील क्रीडा शिक्षकांनी शालेय शहर अॅथलेटिक्स स्पर्धेवर बहिष्कार घातला

शिक्षकांच्या संपाने विद्यार्थी वेठीस
पिंपरी : कला व क्रीडा शिक्षकांबाबतचा राज्य शासनाचा अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील क्रीडा शिक्षकांनी शालेय शहर अॅथलेटिक्स स्पर्धेवर बहिष्कार घातला. यामुळे एकही क्रीडा प्रकार घेतला गेला नाही. सकाळी आठपासून मैदानात उपस्थित झालेल्या खेळाडू आणि पालकांना माघारी फिरावे लागले. बुधवारपासून स्पर्धा नियमितपणे सुरू केल्या जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेतर्फे स्पर्धा इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर सिथेंटिक ट्रॅक येथे मंगळवारी सकाळी नऊला आयोजित केली होती. सकाळी आठपासून खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि पालक मैदानात उपस्थित होते. राज्य शासनाने कला व क्रीडा शिक्षकांच्या कायमस्वरूपी भरतीला बगल देत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामानधन स्वयंसेवकांची अतिथी शिक्षक म्हणून नेमणूक करावी, अशा स्वरूपाचा अध्यादेशाचा निषेध करीत तो रद्द करावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शारीरिक शिक्षक संघटनेने स्पर्धेवर बहिष्कार घातला. त्याला पिंपरी-चिंचवड शहर अॅथलेटिक्स संघटनेने पाठिंबा दिला.
स्पर्धा सुरू करण्यास क्रीडा शिक्षक आणि पंच तयार होत नसल्याने खेळाडू आणि पालकांना ताटकळत उभे राहावे लागले.
जिल्हा क्रीडाधिकारी सुुहास
पाटील यांना ही खबर मिळताच ते दहाच्या सुमारास मैदानावर
दाखल झाले. त्यांना संघटनेने मागणीचे निवेदन दिले. त्यांनी क्रीडा शिक्षक आणि पंचांना स्पर्धा घेण्याची विनंती केली. मात्र, त्यास स्पष्ट नकार देण्यात आला. पाठोपाठ महापौर शकुंतला धराडे, क्रीडा समितीचे सभापती समीर मासुळकर उपस्थित झाले. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मात्र, क्रीडा शिक्षक बहिष्कारावर ठाम ते मैदानात ठाण मांडून बसले होते. सर्वांनी विनंती करूनही त्यांनी माघारी घेतली नाही. हा प्रकार सकाळी अकरापर्यंत सुरू होता. या वेळेत सुमारे एक हजार खेळाडू आणि पालक ताटकळत बसले होते. अखेर स्पर्धा स्थगित केल्याचे संयोजकांनी जाहीर केल्यानंतर त्रस्त खेळाडू आणि पालक निघून गेले. त्यांना विनाकारण हेलपाटा पडला.
या वेळी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुडकर, शहराध्यक्ष चांगदेव पिंगळे, कार्याध्यक्ष निवृत्ती काळभोर, अंगद गरड, शेखर कुलकर्णी, भगवान सोनवणे, तसेच अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव रामदास कुदळे, चंद्रकांत पाटील, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
राज्य शासनाचा निषेध
कला व क्रीडा शिक्षकांचे अस्तित्वच संपुष्टात आणणाऱ्या राज्य शासनाच्या ७ आॅक्टोबरच्या अध्यादेशाचा क्रीडा शिक्षकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. स्पर्धा सुरू करण्याचा वेळेस क्रीडा शिक्षक मैदानात ठाण मांडून बसले. शासन निर्णयामुळे कला व क्रीडा या विषयांच्या दर्जेदार शिक्षणापासून, तसेच मूलभूत हक्कापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत. हे विषय शाळेतून हद्दपार झाल्याने हजारो शारीरिक व कला शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त होतील. ज्या शाळांंना अतिथी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, त्या शाळांमधून हे विषय हद्दपार होतील, असा मुद्दा अनेक शिक्षकांनी उपस्थित केला.