जमिनींचा शेतीऐवजी विनापरवानगी वापर करणारे 'रडार'वर; महसूल विभागाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 04:57 PM2021-03-02T16:57:03+5:302021-03-02T16:57:56+5:30

दंडाची रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार

On the target of those who use land without permission instead of farming | जमिनींचा शेतीऐवजी विनापरवानगी वापर करणारे 'रडार'वर; महसूल विभागाकडून नोटीस

जमिनींचा शेतीऐवजी विनापरवानगी वापर करणारे 'रडार'वर; महसूल विभागाकडून नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देदंडाची रक्कम न भरल्यास सातबाऱ्यावर होणार बोजाची नोंद

पिंपरी : कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जमिनीचा अनधिकृत अकृषक वापर केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाकडून महसूल वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र कृषक अर्थात शेतजमिनींचा शेतीऐवजी इतर कारणांसाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. औद्योगिक, रहिवास तसेच व्यवसायासाठी अशा मिळकतींचा वापर होत आहे. संबंधित मिळकतधारकांकडून त्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच शासनाचा  महसूल भरण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा मिळकतधारकांचा शोध घेऊन त्यांच्या मिळकतींची पाहणी करण्यात येत आहे. त्यात काहींनी जमिनीचा अकृषक कारणांसाठी अनधिकृत वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे अशा मिळकतधारकांना दंड आकारण्यात आला. त्यांना त्याबाबत नोटीस बजावून जमीन महसुलाची मागणी करण्यात आली.   

कार्यवाहीचा दुसरा टप्पा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस क्रमांक दोनही देण्यात आली आहे. मिळकतधारकाने तलाठी यांच्याकडे जमिनीचे कागदपत्र तसेच भाडेपट्टा करार असल्यास सादर करावा. त्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे. मात्र तरीही रक्कम न भरल्यास नोटीस क्रमांक तीन बजावण्यात येऊन सातबारा उताऱ्यावर बोजाची नोंद होईल.
 
चिखली, कुदळवाडीतील मिळकतधारकांचा विरोध
नोटीस बजावण्यात आल्याने चिखली, कुदळवाडी भागातील मिळकतधारकांनी याला विरोध केला होता. कोरोना महामारीमुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत असल्याचे सांगून या नोटीस मागे घेण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही दिले आहे.


जागेच्या क्षेत्रफळानुसार व भाडेपट्टा करार असल्यास त्यानुसार दंडाची आकारणी केली जाईल. चिखली व चऱ्होली येथील काही जणांनी दंड भरला आहे. नोटीस बजावलेल्या मिळकतधारकांनी दंड त्वरित भरावा, अन्यथा कारवाई होईल.   
- गीता गायकवाड, तहसीलदार 

तहसीलदार कार्यालयाची कारवाई
तलाठी सजा - नोटीस
बोऱ्हाडेवाडी - ३३
चऱ्होली - ३९
चोविसावाडी - १८
वडमुखवाडी - १८
चिखली - ४५
भोसरी - १७
दापोडी - ४

Web Title: On the target of those who use land without permission instead of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.