नवरात्रोत्सवात सीसीटीव्ही लावा
By Admin | Updated: September 25, 2014 06:14 IST2014-09-25T06:14:15+5:302014-09-25T06:14:15+5:30
नवरात्रोत्सवाला गुरुवारी घटस्थापनेने सुरुवात होत आहे. शहरात काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

नवरात्रोत्सवात सीसीटीव्ही लावा
पुणे : नवरात्रोत्सवाला गुरुवारी घटस्थापनेने सुरुवात होत आहे. शहरात काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या जवळपास वाहने लावायला बंदी करण्यात आली आहे.
शहरामध्ये एकूण १ हजार ७५ नवरात्र मंडळे आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी. संशयित व्यक्ती, वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी केले आहे. शहरातील भवानीमाता, तांबडी जोगेश्वरी, सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर तसेच चतु:शृंगी येथे नवरात्रादरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, स्थानिक पोलिसांना गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) मदत करणार आहेत. गर्दीत होणारी चेंगराचेंगरी, गैरप्रकार, चोऱ्या रोखण्यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)