हुक्का विक्रीवर कारवाई, लायन्स पॉइंटवर वन विभागाचा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:54 IST2018-01-01T04:53:54+5:302018-01-01T04:54:15+5:30
लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली.

हुक्का विक्रीवर कारवाई, लायन्स पॉइंटवर वन विभागाचा खडा पहारा
लोणावळा : लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली. हुक्का जप्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनपाल विलास निकम यांनी दिली.
वन परिमंडल लोणावळा व वन परीक्षेत्र वडगावच्या अंतर्गत येणाºया लायन्स व टायगर पॉइंटवर आज दिवसभर व रात्री वनपाल निकम, एम. व्ही. सपकाळे, वनरक्षक व्ही. जे. बाबर, वनरक्षक झिरपे, ए. ए. भालेकर, ए. ए. फडतरे, एस. बी. रामगुडे, जी. बी. गायकवाड यांच्या पथकाने वरील कारवाई
केली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लायन्स पॉइंटवर अतिरिक्त बंदोबस्त
नेमत हुक्का विक्री करणाºयांवर कारवाई केली. संयुक्त वन व्यवस्थापन समितीनेदेखील स्थानिक विक्रेत्यांकडून अवैध धंदे होणार नाही याकरिता सूचना दिल्या आहेत.
लायन्स पॉइंट हे ठिकाण मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे व नाइट लाइफचे ठिकाण झाले आहे. अनेक मुंबई व पुणेकर तरुण-तरुणी या ठिकाणी रात्र जागविण्याकरिता येत असल्याने परिसरातील हुल्लडबाजी सर्वश्रुत आहे.
या ठिकाणी सुरू असलेला हुक्का व्यवसाय, तसेच अमली पदार्थांचे सेवन यामुळे मागील काळात या ठिकाणी खुनाचे दोन प्रकार
घडले आहेत. नशेच्या नादात
तरुणांनी या ठिकाणी दरीत
जीवन संपविल्याच्या घटनाही
घडल्या आहेत.
सातनंतर बंदी : निर्णयाची अंमलबजावणी नाही
घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर लायन्स पॉइंट येथील अवैध धंदे रोखण्याकरिता हा पॉइंट सायंकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन व वन विभागाने घेतला होता. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने रात्रभर या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. शनिवारी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. रविवारी मात्र पोलीस प्रशासन व वन विभागाने या ठिकाणी मोठा बंदोबस्त नेमला असून, कडक कारवाई मोहीम सुरू केली आहे.