मोबाईलचोरांचा सुळसुळाट

By Admin | Updated: August 5, 2015 03:16 IST2015-08-05T03:16:13+5:302015-08-05T03:16:13+5:30

तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास

Suspicion of mobile phones | मोबाईलचोरांचा सुळसुळाट

मोबाईलचोरांचा सुळसुळाट

तळेगाव स्टेशन : तळेगावात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईलचोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरांना पकडून मोबाईलचा शोध लावण्यास पोलीसच हतबलता दाखवत असल्याने, नागरिकांनी हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईलबाबत तक्रारी देणेही बंद केले आहे.
आठवडे बाजार व रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी महागडा मोबाईल घेऊन जाणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. कारण, गर्दीच्या ठिकाणी बाजार करण्यात व्यस्त असताना कधी तुमचा मोबाईल मारला जाईल, याची शाश्वती नाही. तळेगावच्या बाजारात तुम्ही प्रवेश केला की, लगेच मोबाईलचोरीचे विषय आपल्या कानी पडतील. परंतु, यात नवल वाटावे असे काहीच नवीन नाही. कारण, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोबाईलचोरी ही नित्याचीच झाली आहे. एवढेच नव्हे, तर काही सुजाण विक्रेते आपणास याबाबतीत मोबाईल सांभाळून ठेवण्याचा इशाराही देतात. हे आता ग्राहकांच्या अंगवळणी पडले आहे.
आपला मोबाईल जपून वापरा, या सूचनेव्यातिरिक्त पोलीस तक्रारदारास काहीच बोलत नाहीत. मोबाईल कंपनीच्या मदतीने आधुनिक यंत्रणेद्वारे काम करून आयएमइआय नंबर किंवा ट्रॅकरद्वारे चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लावणे पोलिसांसाठी जिकिरीचे नक्कीच नाही. पण, तळेगावचे पोलीस या संदर्भात हलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता मोबाईलचोरांचे मनोबल आणि मुजोरी वाढली असून, ते बिनधास्तपणे वावरत आहेत.
काल, रविवारी आठवडे बाजारात फिरल्यावर पाच-सहा मोबाईल चोरीस गेल्याची माहिती मिळाली. पण, याबाबतीत तळेगाव पोलीस ठाण्यात चौकशी केली असता सोमवारी दुपारपर्यंत तरी एकही तक्रार आली नसल्याचे कळाले. चोरी केल्यावर मोबाईल हँडसेट त्वरित स्विच आॅफ करून चोर तेथून पोबारा करतात. त्यामुळे गर्दीत बिचारा पीडित बारीक तोंड करून नाइलाजाने घरी निघून जातो. पोलिसांनी काही तरुण समाजसेवक युवकांच्या मदतीने जर मोबाईल चोरी जाण्याच्या संवेदनशील ठिकाणी बाजारदिवशी साध्या वेशात ‘वॉच’ ठेवला, तर मोबाईलचोरीचे मोठे रॅकेट किंवा टोळी हाती येण्याची दाट शक्यता आहे. परंतु, सध्या तरी ती तसदी घ्यायला पोलीस तयार नसल्याने नागरिकांना मोबाईल चोरीला गेल्यावर गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मोबाईलचोर हे सराईत व यंत्रणेलाही चकवा देणारे असल्याने सर्वच चोऱ्यांचा शोध लागणे कठीण आहे. पण, निदान चोरांचा व काहीअंशी चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध लागला, तरी नागरिकांचा पोलीस खात्यावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे तळेगावकरांचे मत आहे. (वार्ताहर)

Web Title: Suspicion of mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.