पर्यायी रस्त्याची कॅन्टोन्मेंटकडून पाहणी

By Admin | Updated: July 8, 2015 02:25 IST2015-07-08T02:25:37+5:302015-07-08T02:25:37+5:30

बोपखेल-खडकी असा कायमस्वरूपी पूल आणि रस्ता उभारण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेवकांनी पाहणी केली. या संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला जाणार आहे

Survey by alternative road consultant | पर्यायी रस्त्याची कॅन्टोन्मेंटकडून पाहणी

पर्यायी रस्त्याची कॅन्टोन्मेंटकडून पाहणी


पिंपरी : बोपखेल-खडकी असा कायमस्वरूपी पूल आणि रस्ता उभारण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेवकांनी पाहणी केली. या संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. विविध पर्यायांचा विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार आहे.
बोपखेलच्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल-खडकी असा तात्पुरता तरंगता पूल बांधण्यात आला आहे. बोपखेलच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात खडकी बाजारात वाहतूक वाढली आहे. दुचाकीसोबतच रिक्षा, टेम्पो आणि मोटारींची संख्या वाढली आहे. यामुळे खडकीतील दर्गा वसाहत, गवळीवाडा आदी लोकवस्तीतील अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. यातून छोटे अपघात होत आहेत. भविष्यात हा प्रश्न अधिक जटिल होणार आहे.
बोपखेलसाठी पर्यायी रस्त्यासाठी पूल आणि रस्ते बांधण्यासाठी आमदार विजय काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर, नगरसेवक कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर यांच्या शिष्टमंडळाने तात्पुरता पूल, नदीकाठ आणि रस्त्याची पाहणी केली. सध्याच्या ठिकाणचा रस्ता, गाडीअड्डा, खडकीतील महादेव मंदिर घाट रस्ता, खडकी स्मशानभूमी येथून किर्लोेस्कर कंपनी प्रवेशद्वाराजवळचा रस्ता किंवा बोपोडी हॅरिस पुलाजवळ असे कायमस्वरूपी वेगवेगळ्या मार्गांच्या पर्यायांचा विचार केला जाणार आहे. यासाठी लष्कराचे विविध विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पुुणे व पिंपरीचे आयुक्त, जिल्हाधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ब्रिगेडियर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक बोलावण्यात येणार आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा आमदार काळे उपस्थित करणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. या प्रश्नी कायमस्वरूपी मार्ग काढून, विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Survey by alternative road consultant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.