विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
By Admin | Updated: August 7, 2015 00:32 IST2015-08-07T00:32:48+5:302015-08-07T00:32:48+5:30
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी दिल्लीत जाऊन धडकलेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे.
एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री केजरीवालांची भेट घेतली व त्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि ज्या कारणासाठी ते लढत आहेत त्याचेही त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ५५ वा दिवस होता. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांमधील आंदोलनाचा उत्साह आणखी वाढला असून त्यांनी आता थेट दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी आज जंतरमंतर येथे विद्यार्थी संसदेचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक सहभागी झालेले होते. बनारस विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ, जेएनयूमधून हे सारे आलेले होते.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जस्टिस प्रोजेक्ट या नावाने एक परिसंवाद आयोजिलेला आहे. त्या माध्यमातून पाच देशांशी चित्रपट व संशोधन प्रबंधातून नाते जोडले जाणार आहे. (प्रतिनिधी)