- अविनाश ढगे पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे गुरुवारी (दि. ६) प्रथमच एका व्यासपीठावर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते आंबी (ता. मावळ) येथे झालेल्या कार्यक्रमाच्या दीपप्रज्ज्वलनासाठी शेळकेंनी भेगडे यांना हात दिल्याने दोघांच्या मनोमिलनाची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.विधानसभेला मावळच्या जागेसाठी महायुतीकडून बाळा भेगडेही इच्छुक होते. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे भेगडे यांचे तिकीट कापून विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भेगडे यांनी शेळके यांचे काम करणार नसल्याचे सांगून थेट त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला होता.निवडणूक काळात बाळा भेगडे यांनी शेळके यांच्यावर टीका केली होती. तालुक्यातील विकासकामांबाबत दोघांत श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळाली. शेळके यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवून मावळचा गड राखला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) यांचे महायुतीचे सरकार स्थापन झाले, तरीही शेळके आणि भेगडे यांच्यात मनोमीलन झाले नव्हते. दोघेही एकाच व्यासपीठावर येणे टाळत होते. मात्र, गुरुवारी एका कंपनीच्या उद्घाटनासाठी आंबी येथे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आले होते.यावेळी आमदार शेळके आणि भेगडे हेही उपस्थित होते. दोघांना एकाच व्यासपीठावर बघून कार्यक्रमस्थळी त्यांच्या मनोमिलनाची चर्चा रंगली होती. कार्यक्रमाच्या दीपप्रज्ज्वलनासाठी शेळकेंनी भेगडे यांना हात दिल्याने त्या चर्चेला आणखी वारे मिळाले. वाद मिटवून दोघेही मावळच्या विकासासाठी एकत्र येणार का, याची उत्सुकता मावळ तालुक्याला लागली आहे.
सुनील शेळके-बाळा भेगडे यांचे मनोमीलन? दोघे नेते कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर
By अविनाश रावसाहेब ढगे | Updated: February 6, 2025 18:43 IST