अचानक आलेल्या पावसाने तारांबळ
By Admin | Updated: July 27, 2016 04:02 IST2016-07-27T04:02:56+5:302016-07-27T04:02:56+5:30
आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता उन्हाच्या झळा बसत होत्या. त्यानंतर काही वेळातच वातावरणात बदल होऊन

अचानक आलेल्या पावसाने तारांबळ
पिंपरी : आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता उन्हाच्या झळा बसत होत्या. त्यानंतर काही वेळातच वातावरणात बदल होऊन अचानक दुपारी दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या. तब्बल अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन दिवसांपासून उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या होत्या. मंगळवारी सकाळीदेखील आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरीतील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसाच्या धारा सुरू झाल्या. प्रत्येक जण परिसरातील दुकानांचा आसरा घेताना दिसून आले. काही वेळातच शहरातील सर्व रस्त्यांवरची गर्दी ओसरली होती. शहरातील पिंपरी, भोसरी, आकुर्डी, चिंचवड, निगडी, थेरगाव, वाकड, सांगवी या भागातील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे
काही ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या
केल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. अनेक जणांना पावसात भिजावे लागले. (प्रतिनिधी)