विद्यार्थ्यांना मिळणार टॅब
By Admin | Updated: October 13, 2016 02:04 IST2016-10-13T02:04:28+5:302016-10-13T02:04:28+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचा २०१७-१८ या पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांची तरतूद

विद्यार्थ्यांना मिळणार टॅब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचा २०१७-१८ या पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीला सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅब, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व बालवाडीसाठी साहित्य आदी या अर्थसंकल्पाचे विशेष आहे.
दरवर्षी महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पा अगोदर शिक्षण मंडळातर्फे अंदाजपत्रक मांडले जाते. आगामी महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने आॅक्टोबर महिन्यातच शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. अंदाजपत्रक विद्यार्थी केंद्रित आहे.
विद्यार्थ्यांना अधिक सुविधा पुरविण्यात याव्यात, हा हेतू समोर ठेवूनच शिक्षण मंडळाने अर्थसंकल्प तयार केल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकल्पात टॅब खरेदीसाठी ५० लाख, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १० लाख, सौरऊर्जा सिस्टीम ५० लाख, ग्रीन बोर्ड १५ लाख, डस्टबिन २० लाख, वीजरोधक २५ लाख, वॉटर फिल्टर ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठीही विशेष तरतूद केली आहे.
यामध्ये गणवेश एक कोटी, दप्तरासाठी २० लाख, स्काऊट गाईड गणवेशासाठी ५ लाख, विद्यार्थी पीटी शूजसाठी ८५ लाख, रेनकोट खरेदीसाठी ३० लाख, सौरऊर्जा सिस्टीम ५० लाख, बालवाडी खेळणी २० लाख, ग्रीन बोर्ड १५ लाख, डस्टबिन २० लाख, वॉटर फिल्टर ५० लाख, वॉटर बॉटल ४५ लाख, वीजरोधक २५ लाख, स्वेटर्स ४० लाख रुपयांची तरतूद सुचविली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत लवकरच हे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये बदल करण्याचा अंतीम अधिकार स्थायी समितीला आहे. (प्रतिनिधी)