पावले आयटीआयकडे, पर्याय असूनही तरुणांना नोकरीची खात्री नसल्याने निवडला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:41 IST2018-06-17T00:41:09+5:302018-06-17T00:41:09+5:30
औद्योगिकीकरणात अत्याधुनिक यंत्रणेचा होत असलेला अवलंब आणि शासनाचे बदलत असलेले औद्योगिक धोरण यामुळे ४० वर्षांनंतर पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाला महत्त्व आले आहे.

पावले आयटीआयकडे, पर्याय असूनही तरुणांना नोकरीची खात्री नसल्याने निवडला मार्ग
पिंपरी : औद्योगिकीकरणात अत्याधुनिक यंत्रणेचा होत असलेला अवलंब आणि शासनाचे बदलत असलेले औद्योगिक धोरण यामुळे ४० वर्षांनंतर पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाला महत्त्व आले आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे असंख्य पर्याय खुले असूनही नोकरीची शास्वती, पुरेसे वेतन मिळेल याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे कमी खर्चात, कमी कालावधित स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा शाश्वत मार्ग म्हणून तरुणांचा कल पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाकडे (आयटीआय) वळला आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर, वाहन उद्योगांचे हब मानले जात होते. मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आणि शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे औद्योगिक क्षेत्राला सध्या उतरती कळा आली आहे. पुण्यात औंध येथे असलेले शासकीय औद्योगिक तंत्र प्रशिक्षण केंद्र कुशल कामगार घडविण्यात आघाडीवर होते. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये एक केंद्र उघडण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोरवाडी येथे मुलांसाठी तर कासारवाडी येथे महिलांसाठी दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र आयटीआय सुरू केले आहे. शासनाचे बदलते धोरण, विविध करांचा बोजा, मूलभूत सुविधांची वाणवा यामुळे शहरातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. औद्योगिक क्षेत्राला उतरती कळा आली आहे. शासनाने नवउद्योजक घडविण्यासाठी स्टार्टअप इंडिया तसेच कुशल कामगार घडविण्यासाठी स्किल इंडिया अशा योजना जाहीर केल्या आहेत. कमी खर्चात, अल्प कालावधित रोजगार मिळविण्याचा पर्याय म्हणून तरुणवर्ग आयटीआयचा विचार करू लागला आहे. स्वयंरोजगाराच्या उद्देशाने आयटीआय प्रशिक्षणाकडे तरुणांचा कल वाढला आहे.
देशात आणि राज्यात ३५ ते ४० वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाची लाट आली. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत गेल्या त्या काळात औद्योगिकतंत्र शिक्षणाला विशेष महत्त्व आले होते. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये, मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना सहज नोकऱ्या मिळाल्या.
अभियंते कंपन्यांकडे फिरवताहेत पाठ
कंपन्यांमध्ये नोकºया मिळत असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याकडे तरुणांचा कल वाढला होता. अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांची संख्याही झपाट्याने वाढली होती. आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम केलेल्या अभियंत्यांना कंपन्यामध्ये प्राधान्य दिले जात होते. परंतु त्यांना मिळणारे वेतन प्रशिक्षणार्थी कामगारांइतकेच असल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अभियंत्यांनी एमबीए आणि अन्य व्यावसायिक शिक्षण घेऊन कार्पोरेट क्षेत्रात नोकºयांची संधी शोधली. अभियंतेही कंपन्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कंपन्यांना कुशल कामगारांची गरज भासू लागली आहे. औद्योगिक तंत्र शिक्षण प्रशिक्षण घेणाºयांच्या नोकरीची संधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
>शासकीय आयटीआय ओस
औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (आयटीआय) शासनातर्फे चालविल्या जात असल्याने या संस्था फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात आल्या. औद्योगिक क्षेत्रात होणारे काळानुरूप बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमात आधुनिक बदल होणे अपेक्षित होते. सरकारी कारभार त्यामुळे असे बदल घडून आले नाहीत. तेथील अभ्यासक्रम कालबाह्य होत गेले. आयटीआय अभ्यासक्रम केलेल्यांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले तरुण कंपन्यांना मिळू लागले, त्यामुळे आयटीआयवाले मागे पडले होते. शासकीय आयटीआयसुद्धा ओस पडल्या आहेत.