उसळली गर्दी, उत्साह शिगेला
By Admin | Updated: April 15, 2016 03:44 IST2016-04-15T03:44:01+5:302016-04-15T03:44:01+5:30
देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नममस्तक होऊन पुष्पहार अर्पण करण्यासाठी उसळलेली गर्दी, पुतळा परिसरात सुरू असलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम

उसळली गर्दी, उत्साह शिगेला
पिंपरी : देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नममस्तक होऊन पुष्पहार अर्पण करण्यासाठी उसळलेली गर्दी, पुतळा परिसरात सुरू असलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम यामुळे पिंपरी चौकातील पुतळा परिसराचे स्वरूप पालटून गेले. दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंतीला पुतळ्याजवळ गर्दी होत असते. जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यंदा मात्र गर्दीने उच्चांक गाठला. उसळलेली गर्दी अन् उत्साह शिगेला, अशी स्थिती पाहावयास मिळाली.
जयंतीदिनी पहाटेपासूनच विहारांमध्ये बुद्ध वंदनेचे सूर निनादले. ठिकठिकाणी त्रिशरण पंचशीलेचे पठण झाले. विहारांवर सकाळपासूनच पंचशील ध्वज डौलाने फडकले.
कपाळाला निळी पट्टी बांधून, जयभीमचा नारा देणारे युवक, बौद्ध उपासिका, उपासक, समता सैनिक दलाचे जवान यांची सर्वत्र सुरू असलेली जयंतीची धामधूम यांमुळे अवघा परिसर दणाणून गेला.देशाचे भाग्यविधाते ठरलेल्या महामानवाच्या चरणी लीन होण्यासाठी समाजातील विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते. पददलित, शोषित, पीडितांचे उद्धारक ठरलेल्या या महामानवाप्रती सव्वाशे वर्षांनंतरही कृतज्ञता व्यक्त होत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्याबद्दलचे प्रेम,आपुलकी तसूभरही कमी झाली नसल्याने दिवसेंदिवस जयंती सोहळ्याचे स्वरूप वाढत असल्याचा प्रत्यय पिंपरीत उसळलेल्या गर्दीने आला. शहराच्या विविध भागांतून येणारे लोंढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल होत होते. जयंतीच्या आदल्या दिवशीच रात्री १२ वाजल्यापासून नागरिक सहकुटुंब पुतळ्याजवळ येत होते. तेव्हा सुरू झालेली रिघ जयंतीदिनी रात्री उशिरापर्यंत अखंड राहिली.
परिसरात परिवर्तनवादी पुस्तके, बुद्धमूर्ती, बुद्ध,भीमगीतांच्या ध्वनिफिती विक्रीस होत्या. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. डॉ. आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रग्रंथांना मागणी होती.(प्रतिनिधी)
लोकाभिमुख उपक्रम
समाजातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, या हेतूने स्थापन केलेल्या समितीने वह्या व पेन संकलनाचे काम केले. अभिवादनासाठी येणाऱ्यांनी समितीकडे वह्या,पेन जमा केले. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या वह्या, पेन गरीब, गरजू विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू कदम यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिका अर्पण कार्यक्रम घेण्यात आला. विविध संस्थांनी अन्नदान केले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सलग १८ तास वाचन असेही अनोखे उपक्रम जयंतीनिमित्त घेण्यात आले.