तरुणांच्या राजकीय ‘एबीसीडी’ला प्रारंभ
By Admin | Updated: July 13, 2015 04:05 IST2015-07-13T04:05:27+5:302015-07-13T04:05:27+5:30
मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे

तरुणांच्या राजकीय ‘एबीसीडी’ला प्रारंभ
गहुंजे : मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी तरुणांच्या राजकीय ‘एबीसीडी’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी वॉर्डांतील मतदारांची संख्या पडताळून आर्थिक जुळवाजुळव सुरू केली आहे.
निवडणूक कार्यकम जाहीर झाला आहे. पाच वषार्नंतर नव्या जोमाने निवडणुकीत तरुणाईसह इतर भाग घेणार आहेत. आचारसंहिता लागली असून, गावागावांत निवडणूक वारे वाहू लागले आहे.
सायंकाळी गावांतील पारावर पावसाच्या प्रतीक्षेची व राजकीय चर्चा रंगत आहेत. राजकीय वातावरण तापू लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षणही निघाले आहे. ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण जाहीर झाले आहेत. त्यामुळे आपल्या सौभाग्यवतीची किंवा कुटुंबातील महिलांची व इतरांची जात प्रमाणपत्र काढून घेण्यात येत आहेत.
आॅनलाइन अर्ज भरणे, छाननी अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्ह मिळणे या प्रक्रिया झाल्यानंतर राजकीय मंडळी यश मिळविण्यासाठी गावात साम, दाम, दंड, भेद या अस्त्रांसह आपल्या पॅनलचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणूकीची राजकीय एबीसीडी सुरू झाली आहे.
पुढारी वॉर्डावॉर्डांत आपल्या पॅनलमधील उमेदवार निवडण्यासाठी सरसावले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्यासह गावांतील इतर पुढारी गावाची ग्रामपंचायतीचा धुरा आपल्या हातात राहावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. मागील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची गोळाबेरीज सुरूकेली आहे. विविध गावांत तरुणाईने, व्हॉट्स अॅपचा ग्रुप तयार करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)