मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 5, 2015 03:15 IST2015-08-05T03:15:17+5:302015-08-05T03:15:17+5:30
येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देहूगाव : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी नक्की कोण असणार याचा फैसला होणार आहे.
उमेदवारसमर्थक व घरातील सुवासिनींनी मतदान यंत्राची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. पहिल्या दोन तासांतच उमेदवारांच्या घरातील मतदारांनी व जवळच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले. काही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन करीत होते. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच मतदानाचा वेग चांगला होता. दहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक तीन, पाच व सहामध्ये काहीसे मंद गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाचा वेगही मंदावला होता आणि मतदान कर्मचारी मतदारांची वाट पाहत असल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडले आणि मतदान केंद्रांच्या बाहेर रांग लागण्यास सुरुवात झाली. काही उमेदवार १०० मीटर अंतराच्या आत, तर काही उमेदवारांचे समर्थक मतदान इमारतीच्या परिसरात उभे राहून मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. पोलिसांना बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही कार्यकर्ते वॉर्डातील वयस्कर लोकांना आणत होते, मतदान केंद्र लांब असल्याने काही कार्यकर्ते वाहने घेऊन आणण्याचे काम करीत होते. मतदारांना मतदान स्लिप देण्यासाठी मतदान बूथवर लॅपटॉप, मोबाईल या साधनांचा वापर करून तत्काळ मतदारयादीचा नंबर व खोली क्रमांक देत होते.
विठ्ठलनगरमधील पाच व सहा वार्डमध्ये उमेदवारही अनुक्रमे १७ व १४ होते. त्यामुळे त्यांचे देहू-आळंदी रस्त्यावर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ रस्त्याच्या कडेला टाकलेले असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने वाहतुकीची दिवसभर कोंडीच होती. त्यामुळे वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. दुपारच्या वेळी सर्वच उमेदवारांच्या बूथमधील
कार्यकर्त्यांना व मतदान प्रतिनिधींना नाष्टा पुरविण्याचे काम करत होते. मतदानाची वेळ संपत आली तशी उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी तगमग सुरू झाली. परिणामी चार वाजल्यानंतर वार्ड क्रमांक २, तीनच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लागण्यास सुरुवात
झाली. त्यामुळे पोलिसांनाही मतदानप्रक्रिया, वाहतूक व्यवस्था, कार्यकर्त्यांना आवर घालणे हे जिकिरीचे होत होते. प्रशासकीय यंत्रणाही सतर्क होती. (वार्ताहर)