दौंडच्या दक्षिण भागात पेरणीची लगबग सुरू
By Admin | Updated: September 26, 2014 05:50 IST2014-09-26T05:50:48+5:302014-09-26T05:50:48+5:30
दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे.

दौंडच्या दक्षिण भागात पेरणीची लगबग सुरू
खोर : दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे. परंतू या दक्षिण पट्टयामध्ये आॅगस्ट अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
जून च्या पावसाने धडी मारली असल्याने या भागामधील खरीप पिकाचा हंगाम कोलमडून पडला गेला होता. शेतकऱ्यांची उभीची-उभी पिके जळून गेली होती. मात्र आॅगस्टच्या शेवटी काही ठिकाणी मुसळदार तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असल्याने विहीरी, ओढे, नाले, तलाव यांना भरभरुन पाणी आले असल्याने दक्षिण पट्टयामध्ये असलेल्या खोर, देऊळगाव गाडा, नारायणबेट, माळवाडी, पडवी, कुसेगाव या परिसरामधील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
रब्बी पिकांव्यतीरीक्त फेक कांदा, लागण कांदा, भाजी पाल्यांची पिके घेण्यात या भागातील शेतकरी मग्न झाला आहे. कोणी बैलजोडींच्या साहयाने तर कोणी ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाची पेरणी करत आहे. या परिसरामध्ये बैलजोडींच्या साहयाने पेरणीला एकरी २५०० रुपये इतका भाव दिला जात असून ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाच्या पेरणीला १८०० रुपये इतका भाव दिला जात आहे.
काही ठिकाणच्या परिसरामध्ये जास्त पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेताजमिनी पुर्णपणे ओलीताखाली गेल्या असल्याने त्या ठिकाणी पेरणी करणे देखील मुश्कील झाले आहे. शेतजमिनी मधील पाणी आटण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ आली आहे तर काही ठिकाणच्या परिसरामध्ये कमी पाऊस व त्याच वेळी पेरणी केलेल्या शेतामध्ये जास्त उष्णतेमुळे पिके जळून गेली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे. परंतू एकंदरीत रब्बी हंगाम तरी चांगल्या प्रकारे डौलारा धरील अशी अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे. (वार्ताहर)