‘एचए’बाबत लवकरच सकारात्मक निर्णय
By Admin | Updated: August 6, 2015 03:28 IST2015-08-06T03:28:08+5:302015-08-06T03:28:08+5:30
येथील हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स कारखान्याच्या प्रश्नाबाबत एचए मजदूर संघाचे अध्यक्ष व खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी दिल्ली येथे

‘एचए’बाबत लवकरच सकारात्मक निर्णय
पिंपरी : येथील हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स कारखान्याच्या प्रश्नाबाबत एचए मजदूर संघाचे अध्यक्ष व खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘एचएला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले,’ असे बारणे यांनी सांगितले.
शहराच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करणारा पहिला उद्योग म्हणजे येथील एचए कंपनी आहे. एचएची स्थापना १९५४ मध्ये झाली असून, येथील प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हा कारखाना देशातील पहिला पेनिसिलीन कारखाना असल्याचे बारणे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. सध्या हा कारखाना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करीत असून, आर्थिक संकटात सापडला आहे. या कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक पॅकेज तत्काळ मंजूर करावे व कारखान्यातील कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्याची मागणी केली.
एचएची पूर्ण कल्पना असून, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. कारखान्याला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एचए प्रश्नावर चर्चा करताना पंतप्रधानांनी सांगितल्याचे बारणे म्हणाले.(प्रतिनिधी)