‘कही खुशी कही गम...’

By Admin | Updated: November 10, 2015 01:47 IST2015-11-10T01:47:31+5:302015-11-10T01:47:31+5:30

यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर काही कंपन्यांत घसघशीत वेतनवाढीचे करार झाले. १२ ते १८ हजार वेतनवाढ, फरक व बोनस मिळाल्यामुळे त्या कंपन्यांतील कामगारांची दिवाळी धूमधडाक्यात सुरू आहे

'Something happier than that ...' | ‘कही खुशी कही गम...’

‘कही खुशी कही गम...’

पिंपरी : यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर काही कंपन्यांत घसघशीत वेतनवाढीचे करार झाले. १२ ते १८ हजार वेतनवाढ, फरक व बोनस मिळाल्यामुळे त्या कंपन्यांतील कामगारांची दिवाळी धूमधडाक्यात सुरू आहे. त्याच वेळी उद्योगनगरीत काही कंपन्या बंद पडल्या. काही कंपन्यांत पगार रखडले. अनेक कंपन्यांतील बोनसची रक्कम अगदीच कमी होती. या ‘कही खुशी कही गम...’च्या परिस्थितीत शहरातील कामगारांची दिवाळी कशी सुरू आहे, याचा घेतलेला आढावा.
उद्योगनगरीत सुमारे तीन हजार छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. यातील काही नामांकित कंपन्यांमध्ये घसघशीत बोनस झाला. काही कंपन्यांनी पेमेंट आॅफ बोनस अ‍ॅक्टनुसार बोनस केला. साधारण लघुउद्योगापासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बोनस करण्यात आला. उद्योगनगरीतील सर्व कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी कामगारांना मिळणाऱ्या बोनसमुळे त्यांची दिवाळी चांगली साजरी होणार आहे. पिंपरी, भोसरी, चिंचवड, चाकण, तळेगाव या भागातील कंपन्यांमधील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही कंपन्यांमध्ये रोख रक्कमव्यतिरिक्त मिठाईचे पुडे, कपडेही वाटण्यात आले. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कामावर असणारे साफसफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी यांना ठेकेदारांकडून बोनस स्वरूपात काही ना काही भेटवस्तू मिळतात. काही कंपन्यांमध्ये गिफ्ट व्हाऊचरही दिले जातात. पतसंस्था, हॉटेल, विविध कार्यालयांमध्ये अनेक पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू दिल्या. १ एप्रिल २०१४ ते १ मार्च २०१५ या वर्षातील उत्पादन व विक्री समाधानकारक असल्याने या वर्षीचा बोनस ठरल्याप्रमाणे देण्यास व्यवस्थापन तयार आहे. कामगार कायद्यात बदल करण्यावर सरकारने स्थगिती दिल्याने ‘पेमेंट आॅफ बोनस अ‍ॅक्ट’नुसार सर्वांना बोनस मिळणार असल्याचे काही कामगार प्रतिनिधींनी सांगितले.
दिवाळी - किल्ले - चित्र हे एक वेगळे समीकरण आहे. दिवाळीची चाहूल लागताच लोणावळा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात किल्ले, चित्र व पणत्या विक्रीसाठी दुकाने सजली. मात्र, किल्ले व
चित्र खरेदीला अल्प प्रतिसाद
मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’ (एचए) या कंपनीतील कामगारांना गेल्या दीड वर्षापासून थकीत वेतन मिळाले नाही. दिवाळीच्या सनासाठी बोनस मिळेल, अशी आशा होती. अनेक नेत्यांनी मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र दिवाळी सुरू झाली, तरी कामगारांच्या हाती एक छदामही नाही. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एचए कंपनीचे कामगार मात्र अंधारातच आहेत.
२कंत्राटी कामगारांमध्ये मात्र २० टक्के कामगारांनाच बोनस मिळाला असल्याने त्यांच्यात उदासीनता व्यक्त केली जात आहे. अनेक कंपन्यांमध्ये ठेकेदार त्यांच्याकडे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना बोनस देत नाहीत. शहरात राहणाऱ्या लाखो कामगारांपैकी काही कामगारांची दिवाळी जोरदार साजरी होणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात थोडी खुशी, थोडा गम असे वातावरण आहे.

Web Title: 'Something happier than that ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.