काही उमेदवार सैरभर, तर बहुतांश हतबल
By Admin | Updated: September 27, 2014 07:30 IST2014-09-27T07:30:54+5:302014-09-27T07:30:54+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या

काही उमेदवार सैरभर, तर बहुतांश हतबल
पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या. त्यातच गुरुवारी युती तुटली. आघाडी फुटल्यामुळे उमेदवारीअर्ज भरण्यास एकच दिवस उरला असल्याने इच्छुक सैरभर झाले. बांधलेले अंदाज, आडाखे फोल ठरल्याने अनेकांवर हतबल होण्याची वेळ आली.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या प्रमुख पक्षांमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. मोदींच्या लाटेवार स्वार होण्याचे स्वप्न बाळगून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गजसुद्धा भाजप, शिवसेनेच्या वाटेवर होते. कोणत्याच पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वसुद्धा नाही, अशा इच्छुकांनीही भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पक्षप्रवेश करता येईल, या उद्देशाने त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले. काहींनी भाजपमध्ये प्रवेशसुद्धा केला. या घडामोडी सुरू असतानाच गुरूवारी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली. युती तुटल्याचे जाहीर होते ना होते तोच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतसुद्धा फूट पडली. युती, आघाडी संपुष्टात येताच विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आखलेली समीकरणे कोलमडली.
उमेदवारी भरण्यासाठी एकच दिवस उरला असताना, युती, आघाडी संपुष्टात आल्याने निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक असलेल्यांना सैरभर धाव घ्यावी लागली. उमेदवारी मिळविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. युतीच राहिली नाही, तर भाजप वा शिवसेना यांपैकी एका पक्षाची उमेदवारी मिळणे फायद्यात ठरणारे नाही, असा विचार करून काहींनी उमेदवारी नाकारली, तर काहींना उमेदवारी मिळणार नाही, असे
ऐनवेळी सांगण्यात आल्याने धक्काच बसला. अनपेक्षित राजकीय
घडामोडी घडल्याने आता काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. (प्रतिनिधी)